“ही दुर्देवी घटना, एखाद्यावर हल्ला करणं हे चुकीचं”

Published on -

मुंबई : हनुमान चालीसा पठण करण्यावरून राज्यात चांगलेच वातावरण गरम झाले आहे. आज सकाळची ९ वाजता मातोश्रीबाहेर (Matoshri) हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे राणा दाम्पत्याने (Rana couple) सांगितल्यानंतर शिवसेनेकडून (Shivsena) जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत.

अशातच भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohiot Kamboj) यांच्या गाडीवर काही शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. त्यानंतर प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तर मोहित कंबोज हे रेकी करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले, दुर्देवी स्थिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री ज्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यावर हल्ला करणं यावरून राज्य नेमकं कुठं चाललं आहे हे दिसून येतं.

मोहित कंबोज हे मातोश्रीसमोरच्या प्रमुख रस्त्यावरून जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्याचं शिवसैनिकांचं काहीच कारण नव्हतं. अशा प्रकारचा हल्ला करणं योग्य नाही. सरकार आपलं आहे या संरक्षणात हल्ला करणं योग्य नाही.

शिवसैनिकांचं म्हणणं काही असेल पण त्यांना कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणी दिला. परवा पोलखोल यात्रेवर दगडफेक केली. जर कोणी रेकी करत असेल तर मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना आदेश द्यावे.

गृहमंत्र्यांना सांगून कडक कारवाई करावी. पण यांचा कायद्यावर विश्वास नाही. आमच्यावर टीका करणाऱ्यांना ठोकून काढू असं वातावरण होताना दिसतंय. महाराष्ट्र अराजकतेकडे जातो की काय असं दिसून येतंय असे मत दरेकरांनी व्यक्त केले आहे.

शिवसेना नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, नेमकं काय झालं मला माहीत नाही. तुम्ही म्हणता तसं झालं असेल तर हे गृहस्थ जाणून बुजून त्या मार्गाने जात होते.

शिवसैनिकांना डिवचण्यासाठी जात होते का असा संशय मनात येतो. पोलीस आहेत. बॅरेकेड आहेत. पर्यायी मार्ग असताना हाच मार्ग का स्वीकारला. कुणी शिवसैनिकांना जाणूनबुजून डिवचत असेल तर त्याचे परिणाम भोगावेच लागतील.

हा रेकीचाच प्रकार होता. कंबोजचं बॅकग्राऊंड पाहिलं तर ते या कामात एक्सपर्ट आहे. शिवसेनेला त्रास देण्याचे जे प्रकार झाले त्यात कंबोज आघाडीवर होते. नवनीत राणांसाठी ते रेकी करत असतील म्हणून कदाचित शिवसैनिकांचा उद्रेक झाला असेल असे विनायक राऊत म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe