वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कोविड सुसंगत वर्तणूक ठेवा : जिल्हाधिकारी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :-   जिल्ह्यात पुन्हा एकदा काही भागात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. प्रशासनाने आवाहन करुनही काही नागरिक कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करत नाहीत. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे.

तो आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे. विशेषता शनिवार-रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. वास्तविक आठवड्याच्या शेवटच्या दोन्हीही दिवशी जिल्हयात अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत.

त्याचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. तालुकास्तरीय यंत्रणांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापनांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.काही तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे.

त्यामुळे या तालुक्यांतील रुग्ण संख्या आढळून आलेल्या गावांमध्ये तातडीने आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण करुन लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांची चाचणी करण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे असे प्रकार आढळल्यास तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

विशेषता गावांमध्ये ही रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. ही चिंतेची बाब आहे. गावपातळीवर स्थापन करण्यात आलेल्या पथकांनी तसेच तलाठी,

ग्रामविकास अधिकारी, पोलीस पाटील, सरपंच आणि इतर पदाधिकारी यांनी गावात कोरोना संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. गर्दी जमवणारे कोणतेही कार्यक्रम होता कामा नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe