महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्लोस्कर कुटुंबातील अंतर्गत वाद आता थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. आईनेच पोटच्या मुलाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुमन किर्लोस्कर यांनी मुलगा संजय किर्लोस्करविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने याचिकेतील मुद्दे स्पष्ट करण्याचे निर्देश दिले असून, पुढील सुनावणी २ ऑगस्टला होणार आहे.
किर्लोस्कर बंधू यांचे उद्योग क्षेत्रात मोठे नाव आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबातील अंतर्गत वाद हा आता मालमत्तेपर्यंत पोहोचला आहे. यासंदर्भातील खटला मुंबई उच्च न्यायालयात सुरू करण्यात आला आहे. संजय चंद्रकांत किर्लोस्कर, आलोक संजय किर्लोस्कर, रमा संजय किर्लोस्कर, प्रतिमा संजय किर्लोस्कर यांना प्रतिवादी करीत संजय यांची आई सुमन चंद्रकांत किर्लोस्कर यांनी हा दावा दाखल केला आहे.
उच्च न्यायालयाचे न्या. धीरजसिंग ठाकूर यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी ( २५ जुलै) याप्रकरणी सुनावणी झाली. याचिकेतील मुद्दे पुरेसे स्पष्ट करून पुन्हा ही याचिका दाखल करा, असे सांगत न्यायालयाने सुनावणी तहकूब केली आहे.
२०१७ या वर्षी जानेवारी महिन्यात किर्लोस्कर यांच्या पुण्यातील मॉडेल कॉलनीमध्ये राहत्या घरावर प्रवेशद्वार बांधणे सुरू होते. त्यातून संजय किर्लोस्कर आणि अतुल किर्लोस्कर या दोन्ही भावांमध्ये वाद झाला. याबाबत संजयच्या आईने शेवटी पुणे न्यायालयात खटला दाखल केला.
त्यावेळी पुणे न्यायालयाने संजय किर्लोस्कर यांच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळेच सुमन चंद्रकांत किर्लोस्कर यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र सूट याचिका दाखल केली आहे.पुणे न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर संजय किर्लोस्कर यांनी चंद्रकांत शंतनू किर्लोस्कर यांच्याकडे मालमत्तेचे वाटे करण्याची मागणी केली. त्यानंतर पुणे दिवाणी न्यायालयामध्ये हे प्रकरण दाखल झाले.
हिंदू अविभक्त कुटुंब असल्यामुळे त्याअंतर्गत हा खटला सुरू झाला. संजय किर्लोस्कर यांनी दिवंगत वडिलांच्या हिंदू अविभक्त कुटुंबामध्ये असतानाच्या दहा सूचीबद्ध कंपन्यांवर दावा सांगितला. त्यामुळे त्या कंपन्यांची वाटणी होणे अपरिहार्य झाले.
सुमन किर्लोस्कर यांची लकाकी कम्पाऊंड इमारतीमधील १६ हजार चौरस फुटांची स्वतंत्र मालमत्ता आहे. ती मालमत्ता स्वतंत्र असल्याचे त्या मान्य करीत नाहीत, असा दावा मुलगा संजय किर्लोस्कर यांनी याचिकेत केला आहे. परंतु, मृत्युपत्रात तसेच स्पष्टपणे म्हटले असल्याची बाब त्यांनी याचिकेमध्ये अधोरेखित केली आहे.
मुलगा संजय किर्लोस्कर यांनी आईविरोधात खटला दाखल केला. पुणे न्यायालयाने संजय किर्लोस्कर यांच्या बाजूने निकाल दिला, म्हणून त्या निकालाच्या विरोधात सुमन किर्लोस्कर यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. मुंबई उच्च न्यायालयाने देखील यापूर्वी मध्यस्थी करून वाद सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे निर्देश दिले होते.