अवकाळीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जवळपास दीड कोटींचे नुकसान

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- नगर जिल्ह्यात दुसर्‍या दिवशीही अवकाळी पावसाचा धिंगाणा सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी काल सायंकाळी विजांचा कडकडाट तसेच वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली.

पावसाने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात शनिवारी झालेल्या अवकाळी आणि गारपिटीचा 6 हजार 928 शेतकर्‍यांना तडाखा बसला आहे.

या गारपिटीमुळे पाच तालुक्यातील 45 गावातील 4 हजार 430 हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान झाले असून यात प्राथमिक अहवालानूसार 1 कोटी 46 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे.

नुकसानीचा आकडा हा केवळ दोनच तालुक्यातील असल्याने तो वाढणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शनिवारी दुपारी आणि सायंकाळी संगमनेर, राहुरी, शेवगाव, पाथर्डी आणि नेवासा तालुक्यात अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा बसला.

यात शेवगाव तालुक्यातील दहा गावात विविध शेती पिकांचे नुकसान झाले आहे. संगमनेर तालुक्यातील पाच गावात 878 शेतकर्‍यांचे 357 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच पाथर्डी तालुक्यातील 24 गावातील 307 हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे 55 लाख 24 हजार 200 रुपयाचे नुकसान झालेले आहे.

राहुरी तालुक्यातील 4 गावात 6 हजार 50 शेतकर्‍यांचे 3 हजार 730 हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान झालेले आहे. तर नेवासा तालुक्यातील दोन गावातील शेतकर्‍यांचे 36 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे.

गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांची संख्या, बाधित क्षेत्र, एकूण रक्कम यांचा तपशील वाढणार आहे. आज जिल्ह्यातील एकूण नुकसानीची आकडेवारी समोर येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe