अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- लोकांनी तुम्हाला दुसऱ्यांदा संधी दिली. तुम्ही म्हणता बाराशे कोटी रुपये विकास निधी आणला, त्याचा हिशोब काय, तुमचे सल्लागार चुकीचे त्यामुळे तालुक्याचे अतोनात नुकसान झाले.
तुमच्या विविध संस्थांमधील कारभारी कोण अन् कारभार कोण पाहतेय. टक्केवारीसाठी तुम्हाला असे सल्लागार लागतात का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे यांनी करत आमदार मोनिका राजळे यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर घणाघाती टीका केली.
कोरोना योद्धा पुरस्कार वितरण कार्यक्रमादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक बंडू बोरुडे, योगेश रासने, वैभव दहिफळे उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्यास डॉ. दीपक देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, सीताराम बोरुडे, विनय बोरुडे आदी कार्यकर्ते होते.
अॅड. ढाकणे म्हणाले, यापूर्वीच्या नेत्यांनी तालुक्याचे वैभव वाढवले. प्रामुख्याने स्व. बाबूजी आव्हाड, बबनराव ढाकणे, स्व. गणपतराव म्हस्के, स्व.माधवराव निऱ्हाळी, माजी आमदार अप्पासाहेब राजळे, स्व. वसंतराव नाईक, स्व. बाळासाहेब भारदे, स्व. राजीव राजळे यांच्यासारख्या अनेकांचे योगदान लाभले.
आज तालुक्याची काय अवस्था आहे. तुम्ही घोषित केलेल्या विकास निधीने तालुक्याचे नंदनवन व्हायला हवे होते. कोविडसाठीच्या आमदार निधीचे एक कोटी कुठे गेले. तुम्ही लोकांची व तालुक्याची फसवणूक करून टक्केवारीसाठी गुंड, ठेकेदार पोसत आहात. तुमची पंचायत समिती कोण चालवतो, तालुका संघाची काय अवस्था आहे.
ज्याने आयुष्यभर चोऱ्यामाऱ्या, दादागिरी करत गरिबांच्या माना पिरगळल्या त्यांचे पंचायत समितीच्या अभियंत्याच्या अन्नात माती कालवली. खुनाच्या प्रकरणात अशा सल्लागाराच्या मुलाचे नाव घेऊ नये म्हणून एका फौजदाराला बळीचा बकरा बनवले.
अधिकारी हुजरेगिरी करत नाहीत, टक्केवारीचे ऐकत नाहीत म्हणून पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना बळी देणाऱ्या सल्लागारांना तपासा. तुम्हाला सर्व आयते व सुखात भेटले आहे. जिल्हा बँक तुमच्या काखेत आहे. रात्री बारा वाजता पैसे काढता, परस्पर साखर विक्री करता, एवढे वर्ष झाले कारखाना कसा कर्जमुक्त होत नाही.
पालिकेच्या परवानग्या न घेता तुम्ही बाजार समितीत गाळे बांधले आता नोटिसा आम्हाला पाठवता. तुमची पापे धुवून आम्हाला राजकारणाचा वीट आला. नगरपालिकेचा असा अंदाधुंद कारभार सुरू आहे. तुमचे कारभारी काय करतात याची तुम्हाला माहिती नाही, हे लोकांना पटत नाही. स्वच्छतेचा ठेका एवढा महाग देऊन यंत्रणा, तर पालिकेची वापरली जाते.
गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेे. कोणासाठी कोण ठेकेदारी करतो. तुमचे कारभारी नालायक असून त्यांच्यापुढे आहात. मुंडे यांच्या नावाने जॉगिंग पार्कचा फार्स टिकणार नाही. ओढ्यावर पार्क उभारून न झालेल्या कामाचे बिल कसे निघाले. मुंडेंचे नाव वापरून लोकांना मतासाठी भावनिक करायचे, अशी टीका अॅड. प्रताप ढाकणे यांनी केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम