अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्त्या अनेक दिवस उलटल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रखडवल्या आहेत.घटनेनुसार राज्यसरकारने केलेल्या शिफारशींना मान्यता देणे ही राज्यपालांची जबाबदारी असते.
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लोकशाहीची आणि घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला, अशी कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष् शरद पवार यांनी राज्यपाल कोश्यारी यांना मारली.
पवार म्हणाले, मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांना देखील तत्कालीन राज्यपालांनी अशाप्रकारचा त्रास दिल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये देखील राज्यपाल याच पद्धतीने राज्यशासनाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी मात्र केंद्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.
ही गोष्ट चिंताजनक आहे. बारामती येथे पत्रकाराशी संवाद साधताना पवार बोलत होते. पवार म्हणाले, कधी नव्हे ते राज्य मोठ्या आर्थिक संकटात आहे. मात्र राज्य सरकार या सर्व अडचणींमधून नक्कीच मार्ग काढेल. शेतकरी आंदोलनाला शंभर दिवस उलटून सुद्धा शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधत असतील तर यावर काय भाष्य करणार.
शेतकऱ्यांच्या भूमिकेसंदर्भात केंद्र सरकारने सामंजस्याची भूमिका न घेतल्यामुळे संसदेचे कामकाज बंद पडले. या प्रश्नावर शेतकरी जसे अस्वस्थ आहेत. तसेच संसद देखील अस्वस्थ आहे. त्यामुळे याबाबतची प्रतिक्रिया उद्याच्या कामकाजात उमटेल, अशी आशा वाटत असल्याचे पवार म्हणाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|