महाविकास आघाडीचे वर्तन अत्यंत निषेधार्ह व संशयास्पद – डॉ. अजित नवले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:-  केंद्र सरकारच्या वादग्रस्त ३ कृषी कायद्यात जुजबी बदल करून त्यातील बहुतांशी तरतुदी महाराष्ट्र सरकारकडून नव्या कायद्याच्या रूपाने लागू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

एकीकडे विवादित केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध करायचा मात्र दुसरीकडे मागच्या दाराने त्यातील बहुतांश तरतुदी नव्या कायद्याच्या रूप देऊन राज्यात लागू करण्याचे महाविकास आघाडीचे वर्तन अत्यंत निषेधार्ह व संशयास्पद आहे.

महाराष्ट्र सरकारने मागील दाराने केंद्रीय कायद्यांमधील तरतुदी लागू करण्याचा प्रयत्न केल्यास तो अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा अखिल भारतीय मार्क्सवादी किसान सभेचे सचिव डाॅ. अजित नवलेंचा यांनी दिला.

दिल्लीच्या सीमेवर ५०० पेक्षा अधिक शेतकरी संघटनांचा विवादित ३ केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात संघर्ष अद्याप सुरूच आहे. ते कायदे संपूर्णपणे रद्द करण्यासाठीआंदोलन अधिक व्यापक करून शेतकरी संघटनांनी देशव्यापी अभियान सुरू ठेवले आहे.

कृषी कायद्यांना होणारा विरोध पाहता सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. राज्यात सत्तेवरील महाविकास आघाडीतील तिनही घटक पक्षांनी केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध केला.

हे आंदोलन अद्याप संपलेले नसताना व सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठलेली नसतानादेखील महाराष्ट्र सरकार विवादित केंद्रीय कृषी कायद्यांमधील तरतुदी महाराष्ट्रात लागू करण्याची घाई करत आहे? याचे काय कारण आहे,

असा सवाल अखिल भारतीय किसान सभेने उपस्थित केला. तेव्हा विवादित ३ केंद्रीय कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीची राज्य सरकारकडून सुरू असलेली संशयास्पद घाईगर्दी तातडीने थांबवावी.

नक्की कोणते बदल राज्य सरकार करणार आहे, याबद्दलचा स्पष्ट ड्राफ्ट चर्चेसाठी पब्लिक डोमेन मध्ये टाकावा. सर्व शेतकरी संघटना व शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे.

सर्व स्तरावर व्यापक चर्चा घडवून आणावी व त्यानंतरच याबाबत पुढचं पाऊल टाकावे, अशी मागणी किसान सभेने केली आहे.

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना, शेतकरी संघटनांना व किसान सभेला विश्वासात न घेता संशयास्पद घाई करून तीन केंद्रीय कृषी कायद्यांमधील तरतुदी मागच्या दाराने महाराष्ट्रात लागू काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचा कठोर प्रतिकार किसान सभा करेल.

प्रसंगी राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरेल, असेही डॉ. अजित नवले यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe