कृषी आधारित प्रक्रिया उद्योग उभारणे ही काळाची गरज असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकरी बंधूंनी मोठ्या ताकतीने उतरणे गरजेचे आहे. नुसते शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा शेतीसोबतच शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योगांची उभारणी हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक समृद्धीचा कणा बनू शकतो. कृषी आधारित प्रक्रिया उद्योगांचा लागणारा कच्चामाल हा प्रामुख्याने शेतामध्ये तयार होत असल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांना असे उद्योग उभारणे खूप सोपे जाऊ शकते. त्यातल्या त्यात अशा उद्योगांसाठी शासनाच्या देखील अनेक कर्ज योजना असल्यामुळे भांडवलाची चिंता करण्याची देखील गरज नाही.
याच आधारे जर आपण सोयाबीन या पिकाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लागवड केले जाणारे हे तेलबिया वर्गीय पीक असून शेतकऱ्यांचे बरेचसे आर्थिक गणित या पिकावर अवलंबून असते. परंतु जर आपण मागच्या हंगामातला विचार केला तर सोयाबीनच्या दरामुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागले. त्या अनुषंगाने जर सोयाबीन प्रक्रिया उद्योगांची उभारणी केली तर नक्कीच शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टिकोनातून मोठा फायदा होऊ शकतो. त्याच दृष्टिकोनातून सोयाबीन पासून सोया मिल्क अर्थात सोया दूध तयार करण्याचा व्यवसाय नक्कीच शेतकरी बंधूंना फायद्याचा ठरू शकतो.

सोया दूध अर्थात सोया मिल्क म्हणजे काय?
साधारणपणे एक किलो सोयाबीन पासून साडेसात लिटर सोयाबीन दूध तयार करता येते. एवढेच नाही तर एक लिटर सोया मिल्क पासून दोन लिटर फ्लेवर दूध आणि एक किलो सोया दही देखील तयार करता येते. साधारणपणे आपण सोयाबीनचा जर बाजार भाव प्रति किलो 45 ते 50 रुपये किलो पकडला तर एक किलो सोयाबीन पासून आपल्याला दहा लिटर सोया मिल्क तयार करता येते.
वाळवलेले सोयाबीन भिजवून ते बारीक करून त्यापासून सोया दूध तयार केले जाते. याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे गाईच्या दुधामध्ये जितक्या प्रमाणात प्रथिन असतात तितकेच प्रथिने सोया मिल्क मध्ये देखील असतात. सोया मिल्क मशीन किंवा घरातील पारंपारिक उपकरणांचा वापर करून हे दूध आपल्याला घरच्या घरी देखील तयार करता येते.
अशा पद्धतीने घरच्या घरी तयार करू शकता सोयादूध
जर तुम्हाला घरच्या घरी सोयाबीन पासून सोया दूध अर्थात सोया मिल्क तयार करायचे असेल तर त्याकरिता कोरडे सोयाबीन रात्रभर पाण्यात किमान तीन तास किंवा त्याहून जास्त वेळ भिजत ठेवणे गरजेचे आहे. साधारणपणे आठ तास यासाठी पुरेसे होतात. यामध्ये सोयाबीनच्या पाण्याचे प्रमाण वजनाच्या आधारावर 10:1 इतके असणे गरजेचे आहे.
यापासून मिळणारे स्लरी किंवा प्युरी हे पोषण मूल्यांमध्ये वाढ करण्यासाठी तसेच दुधाची चव सुधारण्यासाठी आणि निर्जंतुकीकरण करण्यासाठी उष्णता निष्क्रिय सोया ट्रिपसिन इन्व्हिबिटर्ससह उकळले जाते. ही प्रक्रिया साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटे करणे गरजेचे आहे. त्यानंतर गाळण्याची प्रक्रिया करून त्यामधील जो सोयाबीनचा गाळ विरघळणार नाही तो काढून टाकला जातो. अशाप्रकारे सोयाबीन दूध तयार केले जाते व ते पॅक करून बाजारात विकता येते.
सोयाबीन दुधाला असलेली मागणी व मिळणारा नफा
जर आपण सोया मिल्कचे बाजारपेठेत असलेल्या मागणीचा विचार केला तर शहरांमधील बरेच लोक आता याचा वापर करू लागले असून अनेक तरुण मंडळी फिटनेस साठी सोया दुधाचा वापर करतात. सोया दूध तयार करणारे अनेक मोठमोठ्या कंपन्या या बाजारात आता उतरले असून मोठ्या प्रमाणावर सोया दुधाची विक्री करत आहेत. साधारणपणे 40 ते 45 रुपये लिटर सोया दुधाची किंमत आहे. सोया दुधापासून तयार होणारा टोफू हा 150 ते 200 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. या माध्यमातून दरवर्षी विक्री व्यवस्थापन उत्तम ठेवले तर चार ते पाच लाख रुपयांपेक्षा जास्तीचा पैसा कमवू शकतात.