मराठा आरक्षण : तुम्ही शासन करताय ना? मग जबाबदारी घ्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- अशोकराव, जे तुम्हाला जमलं नाही, त्याचं खापर तुम्हाला देवेंद्रजींच्या डोक्यावर फोडता येणार नाही. तुम्ही शासन करताय ना? मग जबाबदारी घ्या, अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना प्रत्युत्तर दिले.

गुरुवारी सायंकाळी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याला पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

पाटील म्हणाले, एकीकडे महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षणाच्या बाबतीत केंद्र सरकारकडे बोट दाखवत असताना चंद्रकांत पाटील यांनी मात्र मराठा आरक्षणाचा चेंडू राज्य सरकारच्याच कोर्टात असल्याचा दावा केला आहे. आताही बॉल तुमच्याच कोर्टात आहे.

१०२व्या घटनादुरुस्तीनुसार त्या त्या राज्याच्या मागास आयोगाने त्या राज्यातल्या एखाद्या जातीला मागास ठरवायचं. मग ते केंद्राच्या मागास आयोगाला पाठवायचं. मग त्यांनी ते राष्ट्रपतींना पाठवायचं. आणि नंतर पुन्हा कायदा राज्य सरकारनेच करायचा आहे.

राज्य सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही. महाराष्ट्रात मागास आयोगच नाहीये. केंद्रात आहे. गायकवाड कमिशनची मुदत संपल्यानंतर नवीन मागास आयोगाची नियुक्ती केलेली नाही. ती आधी करा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

उच्च न्यायालयातही चाललेली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या मुद्द्यांवरच चालली. विधानसभा आणि विधानसभेत दिशाभूल झालीये असं हे म्हणत आहेत. पण मग २८८ अधिक ७८ लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी होते.

तुमच्या पत्नी देखील त्यामध्ये होत्या. मग दिशाभूल करण्यासाठी ते लहान मुलं आहेत का? तेव्हा हे स्पष्ट होतं की राज्याला अधिकार आहेत. सर्वोच्च न्यायालयातल्या ५ पैकी २ न्यायाधीशांना हे स्पष्ट आहे की राज्याला कायदा करण्याचे अधिकार आहेत.

उच्च न्यायालय, अॅटर्नी जनरल, लोकसभा आणि राज्यसभा यांनाही हे स्पष्ट आहे की राज्याला अधिकार आहेत. मग हे वारंवार काय चाललंय? एक तर यांना कायदा कळत नाहीये. ७०० पानी निकालपत्र यांना नीट कळत नाहीये. महाराष्ट्रातली जनता इतकी दूधखुळी नाही, असेही पाटील म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe