मराठा आरक्षण : पाच जिल्ह्यांत मूक आंदोलन; बुधवारी कोल्हापुरातून एल्गार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- मराठा आरक्षणासाठी आता आरपाची लढाई सुरू झाली आहे. आरक्षण मिळावे, यासाठी पहिल्या टप्प्यात कोल्हापूर, नाशिक, अमरावती, संभाजीनगर, रायगड येथे मूक आंदोलने करण्यात येणार आहेत.

मराठा समाजातील आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेल्यांना देशातील पहिले आरक्षण ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिले, त्या शाहू भूमितून म्हणजेच कोल्हापुरातून १६ जूनपासून मूक आंदोलनाने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा एल्गार सुरू होणार आहे.

कोल्हापूर शहरातील शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी दुपारी सकल मराठा समाजाच्या प्रमुख समन्वयकांची एक बैठक पार पडली. त्यानंतर संभाजीराजे भोसले यांनी मोर्चाऐवजी राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारक समाधी स्थळाजवळ मूक आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला.

सकल मराठा समाजाचे समन्वयकांबरोबर जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, मंत्री यांनी मूक आंदोलनात सहभागी व्हावे.

आम्ही या आंदोलनात कोणीच बोलणार नाही; पण आमदार, खासदार, मंत्री यांनी येथे येऊन आपली मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका स्पष्ट करावी. आम्हाला तुमच्या पाठिंब्याची पत्रे नकोत. तुम्ही तेथे या, भूमिका स्पष्ट करा.

आरक्षण देण्याकरिता कशा पद्धतीची जबाबदारी घेणार, ते ठोसपणे सांगा, असेही आवाहन संभाजीराजे यांनी केले. नाशिक, अमरावती, औरंगाबाद, रायगड जिल्ह्यातही मूक आंदोलने होतील. सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर एकदाच जोर लावला जाईल.

पुण्यातून थेट मंत्रालयावर लाॅगमार्च काढला जाईल आणि त्यात महाराष्ट्रातील सकल मराठा सहभागी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सकल मराठा समाजाच्या आंदोलनात जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदे यांच्या समाधीला १२ जून रोजी खासदार संभाजीराजे भेट देऊन त्यांना अभिवादन करणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe