मराठा आरक्षण : पोलिसांनी परवानगी नाकारली तरी सोलापुरात ४ जुलैला उग्र मोर्चा काढणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- मराठा आरक्षणासाठी 4 जुलै रोजी सोलापूरात उग्र मोर्चा काढणार आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी मोर्चा काढूच, असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिला.

नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या मोर्चाची माहिती दिली. या मोर्चात मराठा समाजच नाही तर शेतकरीही सहभागी होणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात होईल.

लोकप्रतिनिधींशी चर्चा करूनच हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांना भेटून पत्रं देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या मोर्चात सहभागी होण्यासाठी सोलापुरातील लोकप्रतिनिधींसह खासदार संभाजी छत्रपती, खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे यांनाही निमंत्रित करण्यात येणार आहे.

मूक मोर्चा काढून काहीही होत नाही. त्यामुळे उग्र मोर्चा काढणार आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला. मोर्चासाठी पोलिसांची परवानगी असो नसो, आमचा मोर्चा निघणारच. आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रास्तारोको करणार आहोत.

महामार्ग अडवणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. आक्रमक झालो तरच महाविकास आघाडी सरकार दखल घेईल. अन्यथा दाखल घेतली जाणार नाही. मराठा समाज लढवय्या समाज असल्याने आता आक्रमक होण्याशिवाय पर्याय नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केल्याबद्दल त्यांचं त्यांनी स्वागत केलं. पण ही वैयक्तिक याचिका आहे. चांगली गोष्ट आहे. मात्र सरकार अजूनही झोपलेले आहे, अशी टीका त्यांनी केली. ते जातिवंत मराठे आहेत का?

मराठ्यांचा विषय आला की कोरोनाचं कारण दाखवलं जातं. मात्र मागील वर्षी काँग्रेसने ट्रॅक्टर रॅली काढली. ते कसं चाललं? आता आमच्या जगण्यामरण्याचा प्रश्न निर्माण झालाय, त्यामुळे आम्ही आंदोलन करणार आहोत, असं सांगतानाच क्रांती मोर्चाचे लोक कुठे आहेत? ते जातिवंत मराठा आहेत का?, असा सवाल त्यांनी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News