मराठा समाज आक्रमक ! ५ जूनला पहिला मोर्चा निघणार…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- मराठा आरक्षण संदर्भात ५ जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघणारच’, अशी ठाम भूमिका मराठा नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी घेतली असून या अनुषंगाने बीडमध्ये मोर्चाच्या पूर्वतयारीची बैठक संपन्न झाली.

या बैठकीला जिल्ह्यातील निवडक मराठा समन्वयकांची हजेरी होती. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर बीडमध्ये मराठा समाजाचा संताप व आक्रोश दाखवण्यासाठी ५ जून रोजी पहिला मोर्चा होत आहे.

या मोर्चाची तयारी युद्धपातळीवर सुरू असून पाच तारखेला मोर्चा होणारच, असा ठाम विश्वास मेटे यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवला.

आज बीड शहरात शासकीय विश्राम गृह या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या पूर्वतयारी बैठकी संदर्भात माहिती देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा व मराठा नेते आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘५ जूनला सकाळी १०: ३० वाजता मोर्चा बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार असून या मोर्चाला परवानगी मिळो अथवा नाही पण मोर्चा होणारच’ असा निर्णय बैठकीत झाला आहे.

या वेळी या मोर्चाचे नाव ‘मराठा क्रांती संघर्ष मोर्चा, लढा आरक्षणाचा’ असे असणार आहे कोरोनाचे सर्व नियम पाळून हा मोर्चा निघणार आहे.

मोर्चा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जनजागृतीसाठी तीन टप्पे, बीड शहर- तालुका आणि जिल्हा पातळीवर काम सुरू आहे. जिल्ह्यात प्रचार दौरा वैद्यकीय सेवेसह आजपासून सुरू झाला आहे. यासाठी ९ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe