सैन्य भरतीसाठी जाणाऱ्या तरुणांना मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यामुळे मिळाली कोरोना लस

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- सैन्य भरतीसाठी जाणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील तरुणांना मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यामुळे कोराेना प्रतिबंधात्मक लस मिळाली. तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात तरुणांसाठी शनिवारी व सोमवारी दोन दिवस लस देण्याचे नियोजन केल्यामुळे जवळपास चारशे तरुणांना ही लस घेता आली व त्यांचा भरतीला जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

सैन्य दलात भरती होण्यासाठी सात सप्टेंबरपासून भरती प्रक्रिया सुरू होत आहे. त्या अनुषंगाने पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक तरुण तयारीला लागले आहेत.

प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे अनिवार्य असल्याने तरुणांनी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी संपर्क साधून भरतीला जाण्यापूर्वी आम्हाला लस देण्याची मागणी केल्यानंतर तरुणांची ही मागणी लक्षात घेता मंत्री तनपुरे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केली होती.

केंद्राच्या वतीने सैन्यदलात मोठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे पोलिस दलातही भरती प्रक्रिया होणार असल्याने प्रत्येक गावचा बेरोजगार तरुण सध्या भरतीपूर्व तयारी करत आहे.

सायंकाळी व पहाटे करंजीघाट, वृद्धेश्वरघाट, कोल्हार घाट रस्त्यावर तरुण धावण्याचा सराव व व्यायाम करतात. भरतीत सहभागी होणाऱ्या तरुणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे अनिवार्य आहे.

भरतीत सहभागी होण्यापूर्वी तरुणांना प्रतिबंधात्मक लस मिळावी यासाठी उद्धव दूसंग, सरपंच अमोल वाघ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शेख, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख भारत वाढेकर यांनी मंत्री तनपुरे यांच्याकडे मागणी केली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe