अहमदनगर Live24 टीम, 24 जून 2021 :- कोरोनाच्या वैश्विक संकटात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या आमदार निलेश लंके यांची विदेशातही दखल घेतली असून
त्यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस,लंडन’मध्ये समावेश झाल्याची माहिती संस्थेच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा फराह सुलतान अहमद यांनी दिली.
आज (गुरूवारी )दुपारी १ वाजता मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात आमदार लंके यांना स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन संस्थेच्या वतीने गौरवण्यात येणार असल्याचे श्रीमती अहमद यांनी कळवले आहे. दरम्यान अशा प्रकारची नोंद होणारे आ. लंके हे देशातील एकमेव आमदार ठरले आहेत.
आमदार लंके यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस’ मध्ये समावेश झाल्याने त्यांनी कोरोना संकटकाळात केलेल्या सातत्यपूर्ण कामाला जागतिक परिमाण प्राप्त झाले आहे.कोरोना संसर्गाच्या काळात उल्लेखनीय काम केलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,अभिनेता सोनू सूद यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस,लंडन’मध्ये यापूर्वीच समावेश झाला आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर दीड वर्षांपूर्वी देशात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या सुरूवातीला परप्रांतीय तसेच परजिल्ह्यातील कामगार,मजुर, तालुक्यात विलगीकरणात असलेल्या नागरिकांसाठी नगर-पुणे रस्त्यावर आमदार लंके यांनी अन्नछत्र सुरू केले होते.दोन महिने अहोरात्र सुरू असलेल्या
या अन्नछत्राचा लाभ तब्बल साडेचार लाख लोकांना झाला.अन्नछत्राबरोबरच गावाकडे पायी परतणाऱ्या मजुरांसाठी आश्रयाची सोय करण्यात आली होती.निर्बंध शिथील झाल्यावर हजारो मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी आमदार लंके व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली. गेल्या वर्षी जून महिन्यात राज्याच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्गाने उच्छाद मांडलेला असताना
पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात करोनाबाधितांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली.करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी आमदार लंके यांनी तालुक्यातील कर्जुलेहर्या येथे कोविड उपचार केंद्र सुरू केले.या उपचार केंद्रात ४ हजार ६६८ बाधितांनी कोरोनावर मात केली.
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आमदार लंके यांनी भाळवणी येथे १ हजार १०० खाटांचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदीर सुरू केले आहे.मतदारसंघातील तसेच राज्याच्या विविध भागातील बाधितांबरोबरच परराज्यातील करोनाबाधित भाळवणी येथील उपचार केंद्रात दाखल झाले.आजपर्यंत आठ हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
जग संसर्गाच्या दहशतीखाली असताना भाळवणी येथील कोविड उपचार केंद्रात ‘आनंदी वातावरणात उपचार’ ही संकल्पना राबवण्यात येत आहे.त्यामुळे रुग्णांना मोठा मानसिक आधार मिळाला. कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी आमदार लंके आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उपचार केंद्रात मुक्काम ठोकून आहेत.
शेवटचा करोनाबाधित रुग्ण बरा होईपर्यंत उपचार केंद्र सुरू ठेवण्याचा निर्धार आमदार लंके यांनी केला आहे.आमदार लंके करोना संसर्गाच्या काळात करीत असलेल्या कामाची देशात चर्चा झाली.
उत्तरप्रदेश सरकारने आमदार लंके यांच्या कामाची दखल घेत कोविड उपचार केंद्रातील उपचारांची,व्यवस्थापनाची माहिती घेतली.आमदार लंके यांनी केलेल्या या कामाची दखल घेत त्यांचा समावेश ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस, लंडन’मध्ये केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम