अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- कोविड केअर सेंटरमधील सेवा आणि उपक्रमांसाठी चर्चेत आलेला पारनेर तालुका करोनाची लाट ओसरत असताना वेगळ्या अर्थाने चर्चेत आला आहे.
इतरत्र लाट ओसरत असताना जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पारनेर तालुक्यात मात्र नगर जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. आजही तालुक्यात सर्वाधिक १३६ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने निर्बंध कडक केले आहेत.
२१ गावांमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. इतरत्रही गर्दीचे कार्यक्रम घेण्यास बंधने आहेत. ५० लोकांसाठी परवानगी घेऊन सुमारे ३०० लोकांच्या उपस्थितीत एक लग्न सोहळा सुरू होता. याची माहिती मिळाल्यावर तहसीलदार ज्योती देवरे तेथे गेल्या.
त्यांनी उपस्थितांना खडेबोल सुनावत मंगल कार्यालय चालकाला दहा हजार रुपयांचा दंड केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि निर्बंध लागू असतानाही पारनेरजवळ गणपती फाटा येथील गौरीनंदन मंगल कार्यालयात सुमारे ३०० लोकांच्या उपस्थितीत थाटामाटात विवाह सोहळा सुरू होता. यासाठी ५० व्यक्तींची परवानगी घेण्यात आली होती.
तो नियम पाळण्यात आला नाही. गर्दी होऊ नये, ही जबाबदारी मंगल कार्यालय चालकावर सोपविण्यात आलेली आहे.
याची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार देवरे स्वत: पथकासह तेथे गेल्या. तेथे नियमापेक्षा जास्त गर्दी तर होती, अनेकांनी मास्कही लावलेले नव्हते. त्यामुळे देवरे यांनी तेथील माईक हातात घेऊन सर्वांनाच खडे बोल सुनावले.
दरम्यान, गर्दी होण्यास मंगल कार्यालय चालकास जबाबदार धरून दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यापुढे असा प्रकार पुन्हा आढळून आल्यास थेट गुन्हा दाखल करण्याची तंबीही मंगल कार्यालय चालकाला देण्यात आली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम