आई ती आईच… लेकराचा जीव वाचवण्यासाठी ती भिडली थेट वाघाशी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 जुलै 2021 :- सध्या अनेकांना बिबट्या नाव ऐकले तरी अंगाला घाम फुटतो. यातच वाघ म्हंटल तर बोबडीच वाळू लागते.

मात्र प्रत्यक्षात समोर वाघ आला तर काय होईल? याचा विचारही आपण करू शकत नाही. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील हि घटना ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल…

चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना गावात राहणाऱ्या अर्चना संदीप मेश्राम या माऊलीने एका भल्यामोठ्या वाघाच्या जबड्यातून आपल्या मुलीला बाहेर काढत तिचा जीव वाचवला आहे.

मुलीसाठी स्वतःच्या जिवावर उदार होणारी ही माऊली मुलीला उपचारासाठी नागपूरमधील शासकीय रुग्णालयात घेऊन आली. त्यावेळी तिने डॉक्टरांना सर्व घडलेली घटना सांगितली. जंगलानजीक राहणारी अर्चना मेश्राम.

तिची पाच वर्षाची मुलगी प्राजक्ता यांच्यावर घडलेला हा प्रसंग आहे. जंगलानं वेढलेल्या या गावात राहणाऱ्या लोकांना अजूनही फारशी शौचाची सोय नाही आणि त्यामुळे वाघ, अस्वल यांना न जुमानता गावालगतचं जंगल गाठावं लागतं.

असंच आईचा पाठलाग करत जंगलात गेलेल्या या चिमुकलीला चक्क एका मोठ्या वाघानं तोंडांत पकडून फरफटत नेण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी आजूबाजूला मदतीसाठी कोणीही नव्हते. या चिमुकलीचे प्राण वाचवण्यासाठी आईने धाडस करत बांबूच्या साहाय्याने मुलीला वाघाच्या तावडीतून सोडवले. वाघाच्या जबड्यातून मुलगी सोडवल्यानंतर निपचित पडलेल्या मुलीला पाहून आई घाबरली.

गेले 15 दिवस प्राजक्ता चंद्रपूरला दवाखान्यात दाखल होती आणि आता तिच्या जबड्याच्या फ्रॅक्चर्सच्या सर्जरीसाठी तिला नागपूरला आणले आहे. खरचं वाघाला पळवून लावणारी ही आईच खरी वाघीण ठरली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe