अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-करोना रूग्णांच्या उपचारासाठी तातडीने शिर्डी येथे जम्बो कोविड सेंटर उभे करणेसाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
नगर येथे पत्रकार परिषद घेऊन खा. लोखंडे यांनी हि माहिती दिली. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, संजय शेडगे, सुमित नलावडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात अनेक रुग्ण बेड उपलब्ध नसल्यामुळे मृत्यू पावलेले आहेत.
जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता काही तालुक्याच्या ठिकाणांहून जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी बरेच अंतर पार करावे लागते, त्यात तालुक्याहून नगरला जातांना मध्यतंरी ऑक्सिजन व व्हेंटीलेटरची सुविधा नसल्यामुळे अनेक रुग्णांचा रस्त्यातच मृत्यू होत आहे.
जिल्ह्यातील शिर्डी हे अतिशय महत्वपूर्ण ठिकाण असून अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, राहुरी व नेवासा हे सात तालुके व नाशिक जिह्यातील सिन्नर, येवला त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर व गंगापूर तालुके शिर्डी लगत आहे.
शिर्डी येथे साईबाबा विश्व्स्त व्यवस्था मंडळ यांचे 600 बेडचे सर्व सोयींनी युक्त हॉस्पिटल असून शिर्डी शहरातील अतिशय प्रशस्त अशा 10 हजार हॉटेल्स रूम तसेच शेती महामंडळाची देखील जागा उपलब्ध आहेत.
शिर्डी येथे दोन हजार ऑक्सिजन बेड व 200 आयसीयु बेडचे जम्बो कोविड सेंटर चालू केल्यास जिल्हा रुग्णालयवरील ताण कमी होणार असल्याचे खा. लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|