अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- नगर-मनमाड महामार्गाच्या साईड गटार नाल्यांचे काम सुरू आहे. त्यासंबंधी गावकऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन डॉ. सुजय विखे पाटील
यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांसमवेत कोल्हार येथे महामार्गाच्या कामावर समक्ष येऊन पाहणी केली. शेतकर्यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या.

यावेळी विखे म्हणाले, या महामार्गाच्या बाबतीत अनेक लोक वेगवेगळी निवेदने देऊन कामाला अडथळे आणताना दिसून येतात. ज्यांना अडचणी असतील त्यांनी खासदार या नात्याने मला संपर्क करावा.
आम्ही अडचणी सोडविण्यासाठीच आहोत. तहसिलदारांना निवेदन देत बसू नका. अवास्तव मागण्या करून काही विशिष्ट हेतू डोक्यात ठेवून हेतुपुरस्सरपणे महामार्गाचे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यास शासकीय कामात अडथळा आणला म्हणून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
या सर्व समस्यांची विशेषतः शेतातील पाण्याच्या विल्हेवाटीचे नियोजन कसे करता येईल यावर सकारात्मक उपाययोजना करू असे आश्वासन देखील त्यांनी दिले.
दरम्यान शेतकर्यांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर खा. डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, शेतकर्यांचे शेतातील पावसाळ्यातील पाण्याच्या विल्हेवाटीचे प्रश्न आहेत.
शेतीच्या पाण्याला दिशा मिळाली पाहिजे. हे पाणी निघायला नदी हा एकमेव पर्याय आहे. नदीपर्यंत पाणी वाहण्यासाठी काँक्रीट गटार हा सर्वोत्तम पर्याय आहे.
महामार्गाच्या साईड गटाराला खेटून शेतकर्यांनी चर किंवा बंदिस्त नाली केली तर हा विषय कायमचा संपून जाईल. त्याचा डिझाईन आम्ही त्यांना काढून देऊ.
जेवढे ओढे-नाले असतील, शेतकर्यांनी जर परवानगी दिली तर शेतीच्या पाण्यासाठी जी नाली करायची आहे, ती करून दिली जाईल.
यातून शेतकर्यांचा पाण्याचा विल्हेवाटीचा प्रश्न सुटेल आणि रस्ताही चांगल्या पद्धतीने काँक्रीट होईल, असे खा. डॉ. विखे पाटील म्हणाले.
सर्व रस्त्यांच्या कडेने येणारे शेतीच्या पाण्याचे पाईपलाईनद्वारे नियोजन करून ते पाणी नदीत कसे सोडता येईल यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम