आंदोलनाचा इशारा देताच महावितरणचे अधिकारी आले वठणीवर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :-  सरकारी कार्यालयातून कामांमध्ये कमालीची दिरंगाई होत असल्याचा अनुभव सर्वांना येतच असतो. मात्र पावसाळा सुरु झाला असताना विजे अभावी शेतीची कामे खोळंबली होती.

मात्र वारंवार अर्ज करूनही महावितरणकडून कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना रोहित्र व वीज मिळेना. अखेर आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी आंदोलनाचे शस्त्र हाती घेताच प्रलंबित कामे मार्गी लागल्याचा अनुभव कर्जतकरांना आला आहे.

कर्जत तालुक्यातील माळवाडी, रेहकुरी, बिटकेवाडी या भागातील शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून वीज वाहिनी व रोहित्र दुरुस्तीसाठी प्रतीक्षा करावी लागली. या संदर्भात भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव यांनी आंदोलन करण्याचा इशारा देताच महावितरणने संबंधित कामे पूर्ण केली.

माळेवाडी, रेहकुरी, बिटकेवाडी या भागातील शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नवीन वीज वाहिनी टाकून त्यावर रोहित्र बसविणे ही कामे करण्यासाठी एजन्सी नेमल्या होत्या. त्यांनी कामे पूर्ण केली होती. मात्र कामे झाल्यावर वर्षभरात तारा तुटणे, खांब पडणे, वाकणे असे प्रकार झाले होते.

यामुळे या भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. ही कामे पूर्ण करण्यात यावीत यासाठी या भागातील शेतकरी महावितरण कंपनीच्या कार्यालयात हेलपाटे मारत होते. मात्र केवळ होकाराशिवाय शेतकऱ्यांना काहीच मिळाले नाही.

अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव यांच्याकडे हा प्रश्न मांडला. सुनील यादव यांनी महावितरणचे अधिकारी यांची भेट घेऊन या प्रलंबित कामात लक्ष घालण्याची विनंती केली.

अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यावर महावितरणचे अधिकाऱ्यांनीही ही कामे करण्यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीच्या ठेकेदारांना या कामात दिरंगाई व हलगर्जीपणा केल्याबद्दल नोटिसा बजावल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe