अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात सर्वत्र महावितरणने थकबाकी वसुली मोहीम सुरु केली आहे. यातच राहता तालुक्यात वीजबिल वसुली मोहीम सुरु झाली आहे. महावितरणने येथील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
यामुळे उभी पिके जळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. गहू, हरबरा, जनावरांच्या चार्याची पंचायत होण्याची शक्यता असून अधिकार्यावर वरिष्ठ स्तरातून वसुलीचा दबाव वाढत असल्याने त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता थेट वीज पुरवठा बंद करण्यास सुरूवात केली आहे. ही कारवाई त्वरीत मागे घ्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहे.
याबाबत शेतकर्यांना वीज वितरण कंपनीकडून कोणत्याही सुचना देण्यात आल्या नसल्याच्या शेतकर्यांच्या तक्रारी आहे. राहाता तालुक्यात विज वितरण कंपनीकडून शेती पंपाचा विज पुरवठा बंद करण्यास सुरूवात झाली असून पहिल्याच दिवशी राहाता, साकुरी आदी गावात 50 हून अधिक डिप्या बंद करण्यात आल्या.
विशेष म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता थेट डीपी बंद करण्याची कारवाई सुरू झाल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. गेल्या अनेक वर्षापासून सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे शेती पंपाची विज बिले थकीत झाली असताना अचानक पुर्ण विज बिलाच्या 50 टक्के रक्कम भरा व कृषी योजनेचा लाभ घ्यावा, असे सांगण्यात येत आहे.
अनेक वर्षापासून थकीत असलेली लाखो रूपयांची विज बिलाची रक्कम मोठी असल्याने ती भरण्यासाठी शेतकर्यांची सध्या तरी आर्थिक परिस्थिती नाही. करोनाच्या लॉकडाऊन मुळे अगोदरच शेतकरी कफल्लक झाला त्यात अतिवृष्टी मुळे उभी पिके वाया गेली. सरकारने मदतीच्या केवळ घोषणा केल्या मात्र दमडीचीही मदत शेतकर्यांना मिळाली नाही.
पेरू, डाळींब बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सोयाबीनचेही मातेरे झाले. दैनंदिन खर्च कसा भागवायचा याची पंचायत शेतकर्यापुढे असताना लाखो रूपयांची थकीत विज बिले भरा अन्यथा शेती पंपाचा विज पुरवठा बंद यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved