Mumbai Nashik Highway : नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटणार

Ahmednagarlive24
Published:

Mumbai Nashik Highway :- नाशिक-मुंबई महामार्गावरील रस्त्यांची दुरवस्था ऑगस्ट २०२४ पर्यंत दूर होऊन त्यावरील वाहतूक कोंडीही सुटेल, अशी ग्वाही मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्‍नांवर सरकारची बाजू मांडताना दिली.आमदार रईस शेख यांनी विधानसभेत नाशिक-मुंबई रस्त्याच्या कोंडीचा तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. नाशिक-मुंबई या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे.

काही मिनिटांच्या अंतरासाठीही काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. यामुळे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही रस्त्यांच्या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले. भिवंडी-बायपास ते ठाणे या प्रवासामध्ये दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. जळगाव-धुळे-अहमदनगर आणि विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे याच मार्गाला जोडलेले आहेत.

वर्दळीचा हा रस्ता असून नेहमीच वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे, अनिल पाटील या मार्गावरून ये-जा करतात. आज सत्तेत आहेत. परंतु विरोधात असते तर रस्त्याच्या वाहतूक कोंडीवरून आरडाओरडा केला असता, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला.

नाशिक-मुंबई महामार्गावर नेहमीच वर्दळ असते. वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मागील आठवड्यापासून वाहतूक कोंडीचा आढावा घेत आहोत. आवश्यक त्या ठिकाणी उपाययोजना सुरू आहेत. रस्ते मार्गावर येत्या आठवड्यात ५० ट्क्के बदल झालेला दिसेल. तसेच ऑगस्ट २०२४ पर्यंत रस्त्यांवरील वाहतूक समस्या सोडवण्यात येईल, असे मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले.

राज्यात अनेक ठिकाणी पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू आहेत. भविष्यात असे पायाभूत प्रकल्प करताना पर्यावी व्यवस्था उपलब्ध करावी, अशा सूचना यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य शासनाला केल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe