अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढताच सर्वसामान्यांसह राजकीय मंडळींची लसीकरणाकडे ओढ वाढली आहे.
तासंतास रांगा लावूनही सर्वसामान्यांना लस मिळत नाही. मात्र काही राजकीय व्यक्तींकडून लसीकरणाचा काळाबाजार सुरु असल्याची चर्चा सध्या नगरमध्ये रंगत आहे.आता या प्रकरणी काँग्रेसन आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मनपाच्या सावेडी लसीकरण केंद्रावर बुधवारी एक गंभीर प्रकरण घडल्याचे समोर आले आहे. या केंद्रावरील परिचारिकांना लस घेऊन एका खासगी ठिकाणी बोलावले गेले व तिथे काहींचे लसीकरण झाल्याची चर्चा आहे.
सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय दबावातून खासगी जागेत महापालिकेचे बेकायदेशीरपणे लसीकरण सुरू आहे. वशिलेबाजीसोबतच लसीचा काळाबाजार सुरू आहे का? याची चौकशी करावी आणि लसीकरणात पारदर्शकता आणावी, अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.
काँग्रेसकडून आयुक्तांवर प्रश्नांचा भडीमार :- सावेडी मनपा आरोग्य केंद्रावरून आपल्या कर्मचाऱ्यांनी लस डॉन बॉस्को या ठिकाणी नेल्या, हे खरे आहे का? डॉन बॉस्को हे ठिकाण लस देण्याचे मनपाचे अधिकृत ठिकाण आहे का?
सावेडीच्या मूळ केंद्रावर किती आणि डॉन बॉस्को येथे किती लस नेण्यात आल्या? ही संख्या कोणी आणि कशाच्या आधारे निश्चित केली? याची मनापा रेकॉर्डला मनपा कार्यालयापासून ते प्रत्यक्ष लस घेतलेल्या नागरिकांपर्यंत सर्व नोंदी करण्यात आल्या आहेत का? असे अनेक प्रश्न विचारले.
या प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे आयुक्तांकडे करण्यात आली आहे. काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद,
शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी कॉंग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते यांच्या सह्या आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|