दुचाकी खरेदी-विक्रीच्या वादात तरूणाचा खून; दोघांना न्यायालयाने ठोठावली ही शिक्षा

Published on -

Ahmednagar News  :- दुचाकी खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून झालेल्या वादातून तरूणाचा खून केल्याप्रकरणी दोघांना जन्मठेप आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. व्ही. कुर्तडीकर यांनी ठोठावली.

रोहित रमेश कांबळे व शुभम शाम कांबळे (दोघे रा. सदर बाजार, भिंगार) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी शेखर देविदास गायकवाड या तरूणाचा खून केला होता.

1 मार्च 2017 रोजी भिंगारमधील सदर बाजारात शेखर गायकवाड आणि कांबळे कुटुंबियांचा वाद झाला होता. शुभम कांबळे याला दुचाकी घ्यायची असल्याने त्याने शेखरला पैसे दिले होते.

त्या बदल्यात शेखरने त्याला जुन्या वापराची एक दुचाकी घेऊन दिली. परंतु, ती पसंत न पडल्याने शेखर आणि शुभम यांचे वाद झाले होते.

शुभमने शेखरला अर्बन बँके नजिक पालखीच्या ओट्याजवळ बोलावले. सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास पालखीच्या ओट्याजवळ माला रमेश कांबळे, रोहित रमेश कांबळे, शुभम शाम कांबळे हे तिघे उभे होते. शेखर तेथे गेल्यानंतर त्यांच्यात व्यवहारातून वाद झाले.

चिडलेल्या शुभमने शेखरला मारहाण करण्यास सुरुवात केली. मालाने शेखरला धरून ठेवले तर रोहितने चाकूने त्याच्यावर वार केले. शुभमने सिमेंटचा ब्लॉक शेखरच्या डोक्यात टाकला. त्यामुळे शेखर जागीच ठार झाला.

याप्रकरणी शेखरच्या भावाने भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार आरोपी माला कांबळे, रोहित कांबळे व शुभम कांबळे यांच्याविरूद्ध खुन आणि भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता.

तत्कालिन सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार यांनी काम पाहिले.

त्यांनी सरकार पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासले. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शेखरचा भाऊ, तपासी अधिकारी विनोद चव्हाण, शवविच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज घुगे, आरोपींची वैद्यकीय तपासणी करणारे डॉ. अशोक खटके आदींच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांच्या साक्षींच्या आधारे आरोपी रोहित व रमेश कांबळे यांना दोषी धरण्यात आले. खुनाबद्दल दोघांना जन्मठेप, प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड, हा दंड न भरल्यास एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. रोहितला आर्म ऍक्टनुसार दोषी धरून एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड ठोठावला.

तर माया कांबळे हिला संशयाचा फायदा देत मुक्त केले. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील पवार यांना ऍड. सतीश पाटील यांचे मागदर्शन लाभले. पोलीस कर्मचारी एन. ए. थोरात व डी. एच. खेडकर यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe