नडला त्याला तोडला ! पत्रकाराचे अपहरण करून जंगलात नेले, तेथे त्यांचा खून केला दहशत दाखविण्यासाठी मृतदेह पुन्हा गावात !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :- ६ एप्रिल २०२१ रोजी पत्रकार दातीर दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी मोटारीतून आलेल्या आरोपींनी त्यांचे अपहरण केले.

त्यानंतर काही तासांतच त्यांचा मृतदेह आढळून आला होता. कामात आडवे आल्यावर आपण कोणालाही सोडत नाही, अशी दहशत निर्माण होऊन भविष्यात कोणीही नादी लागू नये, यासाठी राहुरीतील पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची हत्या झाल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

आरोपींनी त्यांचे अपहरण करून जंगलात नेले, तेथे त्यांचा खून केला आणि लोकांमध्ये दहशत बसविण्यासाठी मृतदेह पुन्हा गावात आणून टाकल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. यातील मुख्य आरोपी कान्हू मोरे याच्यासह चार आरोपींविरुद्ध पोलिसांनी साडेनऊशे पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे याचे व पत्रकार रोहिदास दातीर यांचे गणेगाव येथील शेतीवरून वाद होते. त्यामुळे त्यांचा कायमचा काटा काढण्याचे मोरे याने ठरविले. त्याने साथीदार तोफिक मुक्तार शेख, अक्षय सुरेश कुलथे, लाल्या उर्फ अर्जुन विक्रम माळी या तिघांना राहुरी येथे बोलावून घेतले.

दातीर यांचे अपहरण करून त्यांना ठार मारण्यासाठी सुपारी दिली. आरोपींना प्रत्येकी दहा हजार रुपये ॲडव्हान्स रक्कम दिली. कामासाठी स्वतःची मोटार दिली. त्यानुसार आरोपींनी राहुरी येथील मल्हारवाडी रोड वरून पत्रकार दातीर यांचे अपहरण केले. वाहनातून दरडगाव येथील जंगलात निर्जनस्थळी नेऊन मारहाण केली.

त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर लोकांमध्ये दहशत निर्माण होऊन भविष्यात कोणीही नादी लागू नये, यासाठी दातीर यांचा मृतदेह राहुरी शहरात आणून टाकून आरोपी पळून गेले, असा आरोप दोषारोपपत्रात ठेवण्यात आला आहे.

दरम्यान आरोपी कान्हू गंगाराम मोरे, लाला उर्फ विक्रम अर्जुन माळी, तोफिक मुक्तार शेख, अक्षय सुरेश कुलथे या चौघांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आर्थिक मदत केल्याचा आरोप असलेला व्यापारी अनिल जनार्धन गावडे यालाही या गुन्ह्यात आता आरोपी करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News