पाणी प्रश्‍नी निंबळकच्या शिष्टमंडळाने घेतली उद्योग मंत्री अदिती तटकरे यांची भेट

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-शहरा जवळ व एमआयडीसीलगत असलेल्या निंबळक (ता. नगर) गावाची लोकसंख्या विचारात घेता गावाचा पाणी प्रश्‍न गंभीर बनला आहे.

गावाला एमआयडीसी कडून होणार्‍या दररोजच्या पाणीपुरवठ्यात वाढ होण्याच्या मागणीसाठी गावाच्या शिष्टमंडळाने आमदार निलेश लंके यांच्यासह उद्योग मंत्री ना. अदिती तटकरे यांची मुंबई मंत्रालयात भेट घेऊन, गावाच्या पाणी प्रश्‍नावर चर्चा केली.

उद्योग मंत्री तटकरे यांनी गावाचा पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी बुधवार दि.24 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात निंबळक सरपंच, उपसरपंच सदस्यांसह एमआयडीसीचे अधिकारी, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावली.

यावेळी अजय लामखडे, उपसरपंच बाळासाहेब कोतकर, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत शिंदे, भाऊ शिंदे, सोमनाथ गायकवाड, भाऊराव गायकवाड, घनश्याम म्हस्के, समीर पटेल, रावसाहेब कोतकर आदी उपस्थित होते.

निंबळक गावाला एमआयडीसी कडून दररोज साडेपाच लाख लीटरचा पाणीपुरवठा केला जातो. हा पाणीपुरवठा सन 2001 च्या जनगणनेनुसार असणार्‍या लोकसंख्येचा विचार करून केला जातो.

परंतु ग्रामपंचायतीचे 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 8 हजार 300 इतकी आहे. आज रोजीची लोकसंख्या अंदाजे 15 हजार पेक्षा जास्त आहे. तसेच एमआयडीसी क्षेत्र जवळ असल्याने तरंगती लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

यामुळे गावाला पाणी टंचाईस सामोरे जावे लागत असून, ग्रामपंचायतीला ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा अत्यल्प असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

ग्रामस्थांचा पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी दररोजच्या पाणीवाटपाचा कोटा वाढवून 15 लाख लीटर करण्याची मागणी निंबळक ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन उद्योग मंत्री तटकरे यांना देण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe