निर्भयाची आई म्हणते मुख्यमंत्री साहेब, माझ्या छकुलीला …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-  कर्जत तालुक्यातील कोपर्डी (Kopardi) येथील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या घटनेला आज पाच वर्षे पूर्ण झाली.

यानिमित्त ग्रामस्थांनी एकत्र येत तिला श्रद्धांजली अर्पण केली. या प्रकरणात मृत्यू पावलेली पीडिता व तिचे कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आज कोपर्डी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन या घटनेतील निर्भयाला श्रद्धांजली अर्पण केली.

मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला व नागरिक उपस्थित होते. आजही या घटनेच्या आठवणीने पीडितेची आई तिच्या आठवणीने हुंदके देत आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आपल्या भावना ना आवर घालत पीडितेची आई पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की,

‘आज या घटनेला पाच वर्षे झाली पण अजून आम्हाला व माझ्या छकुलीला न्याय मिळालेला नाही. या पूर्वीचे राज्यातील सरकार व विद्यमान सरकार हे सर्व जण आम्हाला न्याय मिळेल असे केवळ आश्वासन देत आहेत.

आमची मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आपण स्वतः लक्ष घालून हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये चालवावा व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. त्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही.’ कोपर्डीमध्ये १३ जुलै २०१७ रोजी ही घटना घडली होती.

आजोबांच्या घरी भाजी करण्यासाठी मसाला आणण्यासाठी गेलेल्या मुलीला आरोपींनी रस्त्यात अडवून तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिचा खून करण्यात आला. ही घटना तेव्हा राज्यभर चर्चेत होती.

अहमदनगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात काही वर्षांपूर्वीच या खटल्याचा निकाल लागला आहे. न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर हा खटला मुंबई उच्च न्यायालयात गेला आहे. तेथे तो अद्याप प्रलंबित आहे.

या घटनेला पाच वर्षे झाल्याच्या निमित्ताने कोपर्डीतील ग्रामस्थांनी या मुलीला श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पीडितेचे वडील आजही या घटनेमधून सावरले नाहीत.

आम्हाला न्याय कधी मिळणार असा सवाल त्यांच्या डोळ्यांमध्ये आजही दिसून येतो. मी माझं सर्वस्व गमावले आहे. आज या घटनेला पाच वर्षे झाले तरीही ते नराधम अजूनही जिवंत आहेत. साहेब आम्हाला न्याय मिळेल का? असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe