प्रख्यात बॉलीवूड कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली त्याच्या उच्च अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांनंतर एडलवाईस एआरसीने कर्ज फेडण्यासाठी देसाई यांच्यावर दबाव आणल्याचा इन्कार केला आहे. कर्जवसुलीसाठी देसाई यांच्यावर कोणताही ‘अवाजवी दबाव टाकण्यात आलेला नाही, असे कंपनीने म्हटले आहे.
रायगड पोलिसांनी देसाई यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली एडलवाईस ग्रुपचे अध्यक्ष रेशेश शहा आणि एडलवाईस एआरसीच्या अधिकाऱ्यांसह इतर चार जणांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल नोंदवला.
![Edelweiss ARC](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/08/ahmednagarlive24-ahmednagarlive24-Edelweiss-ARC.jpg)
त्यानंतर कंपनीने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. एडलवाईस एआरसीने रिझर्व्ह बँकेने अनिवार्य केलेल्या सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन केले होते आणि कायदेशीर चौकटीच्या बाहेर कोणतेही कार्य केलेले नाही.
नितीन देसाईंच्या कंपनीकडून आम्ही जास्त व्याजदर आकारला नाही. तसेच कर्जदारावर वसुलीसाठी कधीही अनावश्यक दबाव टाकला नाही. आम्ही आमचे पैसे परत मिळवण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींचा अवलंब केला होता, असे पत्रकात म्हटले आहे.
कंपनीच्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, एडलवाईस एआरसीला नितीन देसाई यांच्या निधनामुळे दुःख झाले आहे. काही गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही सांगू इच्छितो की, नितीन देसाई यांच्या कंपनीला थीम पार्क आणि भांडवल उभारण्यासाठी २०१६ आणि २०१८ मध्ये आर्थिक मदत देण्यात आली होती.
२०२० पासून कंपनीला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला आणि कंपनीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी विविध प्रयत्न केले; पण त्यांना यश आले नाही.
त्यानंतर देसाईंच्या कंपनीला २०२२ मध्ये एनसीएलटीकडे (राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण) पाठवण्यात आले आणि जुलै २०२३ मध्ये एनसीएलटीने देसाईंच्या कंपनीविरोधात दिवाळखोरीची कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
नितीन देसाईंच्या निधनाने भारतीय कलाविश्वाची मोठी हानी झाली आहे. आम्हाला माहीत आहे की, अशा दुःखद घटनांची चौकशी करावी लागते आणि त्याचा आम्ही आदर करतो. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात आम्ही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करू आम्हाला विश्वास आहे की, आम्ही कायदेशीर प्रक्रियेचे पालन केल्याचा निष्कर्ष तेदेखील काढतील, असेही कंपनीने म्हटले आहे.