आता प्रामाणिकपणे मोदीजींचे आभारही माना…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारवर १४,७७५ कोटी रुपयांच्या अनुदानाचा अतिरिक्त बोजा सोसून शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या दराने डीएपी रासायनिक खत उपलब्ध करून दिले आहे.

दरवाढीबद्दल तक्रार करणाऱ्या काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आता प्रामाणिकपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले पाहिजेत, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

पाटील म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात फॉस्फॅरिक ॲसिड, अमोनिया आदी रसायनांच्या किंमती वाढल्याने खत उत्पादक कंपन्यांनी डीएपी खताच्या किंमतीत वाढ केली. त्याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खतासाठीचे अनुदान १४० टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला.

परिणामी शेतकऱ्यांना या खताच्या गोण्या गेल्या वर्षीच्याच भावाने मिळणार आहेत. केंद्र सरकारवर वाढीव बोजा पडणार असला तरी शेतकऱ्यांसाठी भाववाढ रद्द झाली आहे.कंपन्यांनी भाववाढ केल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकार सातत्याने प्रयत्न करत होते.

त्या दृष्टीने निर्णय प्रक्रिया चालू होती. सरकार शेतकऱ्यांना अनुदान वाढवून देण्याच्या विचारात आहे, असे केंद्र सरकारने १५ मे रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषित केले होते.

त्यानंतर पाच दिवसात निर्णयही घेतला. सरकारच्या निर्णयप्रक्रियेसाठी पुरेसा वेळ न देता राष्ट्रवादी काँग्रेसने याविषयात राज्यभर आंदोलन सुरू केले तर काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला.

आता मोदी सरकारने तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा दिला याबद्दल या पक्षांनी सरकारचे आभार मानावेत. असे पाटील म्हणाले

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News