आता कुठे गेला शेतकऱ्यांचा ‘पाणीदार नेता’ ?

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :-  शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यानंतर पावसाने दडी मारली आहे. १५ ते २० दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळू लागली आहेत. शेतकरी आधीच कोरोनाच्या संकटात सापडला असल्याने आर्थिक अडचणीत आहे.

त्यात परत पावसाने दडी मारली आहे. एकीकडे शेतकऱ्यांची वाताहात होत असताना जिल्ह्यातील मंत्री मात्र शांत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना अक्षरक्ष:वाऱ्यावर सोडले आहे. आता कुठे गेला शेतकऱ्यांचा पाणीदार नेता शेतकऱ्यांची पिके वाचविण्यासाठी मुळा धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातुन शेतीसाठी अवर्तन सोडावे.

शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले उभी पिके जळून चालली आहे. येत्या आठ दिवसात शेतीसाठीचे आवर्तन सोडावे अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी दिला आहे.

ते पुढे म्हणाले की, पालकमंत्री व जिल्ह्यातील मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या काळात मी आमदार असताना मुळा धरणातून वेळेवर शेतकऱ्यांसाठी आवर्तन सोडली होती. तरीसुद्धा जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी रस्त्यावर उतरून स्टंटबाजी करत आंदोलन केले होते.

आता तर ते राज्याच्या सरकारमध्ये जलसंधारण मंत्री आहेत. आता कुठे गेला शेतकऱ्यांचा पाणीदार नेता. नेवासा तालुक्यातील जनतेची दिशाभूल त्यांनी केली आहे.

मतदार संघात ते दिसत नाहीत, शेतकऱ्यांच्या व्यथा मुंबईमध्ये राहून कळत नसतात, त्यासाठी मतदार संघात शेतकऱ्यांशी संवाद साधावा लागतो.

परंतु मंत्रीमहोदय मुंबई येथे एसीमध्ये बसून राहतात, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांना आता विसर पडला आहे असा आरोप मुरकुटे यांनी केला. येत्या आठ दिवसांमध्ये मुळा धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्याची मागणी त्यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe