अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- कोरोनाच्या संकटात नेमणुक असलेल्या मुख्यालयी उपस्थित न राहणार्या नगर जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे कॉल लोकेशन तपासून यामध्ये दोषी आढळणार्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोपान रावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जवळील भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण केले.
तर या तक्रारीवर कार्यवाही होत नसेल तर जिवंतपणीच शरीर दान घेऊन त्यापासून मिळणारे पैसे शासनाने कोरोनाच्या मदत निधीसाठी जमा करून घेण्याचा इशारा दिला होता. उपोषणाच्या दुसर्या दिवशी या प्रकरणी कारवाई करण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्याने सदरचे उपोषण मागे घेण्यात आले.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवण्यासाठी नगर जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना कामाच्या नियुक्त ठिकाणी मुख्यालयी उपस्थित राहण्याचे लेखी आदेश दि.3 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. तरी नगर जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने मुख्यालयी उपस्थित राहत नाही.
त्यामुळे शासनाचे आणि सामान्य जनतेचे मोठे नुकसान होत आहे. मुख्यालयी न राहता इतर ठिकाणाहून कामाच्या ठिकाणी ये-जा करत असलेल्या कर्मचारी, अधिकारी यांच्यापासून कोरोना रोगाचा प्रसार होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी हे खरोखर मुख्यालय राहतात की नाही? याची खात्री करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे कॉल डिटेल्स नुसार लोकेशनची तपासणी करून या तपासणीमध्ये दोषी आढळणार्यावर कारवाई करावी, तसेच या अधिकार्यांना पाठिशी घालून सदर प्रकारणाची माहिती शासनापासून लपवून ठेवणारे दोषी सरपंच या अधिकारी,
कर्मचारींकडून आर्थिक हित जोपासत असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रावडे यांनी केली आहे. या प्रकरणी कांगोणी सरपंच यांना मेसेज पाठविला असता त्यांनी शिंगणापूर पोलीस स्टेशनला बोलावून गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन दहशत निर्माण केल्याचा रावडे यांचा आरोप आहे.
तर सदरची तक्रार केल्यामुळे मुख्यालयी न राहणार्या अधिकार्यांपासून आणि त्यांना मदत करणारे सरपंच यांच्यापासून जीवितास धोका निर्माण झाला असल्याचे त्यांनी निवेदनात नमुद केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम