अरे बापरे!! पत्ता सांगणे पडले महागात दोन भामट्यांचा व्यापाऱ्यास सव्वालाखास गंडा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :- येथील एका व्यापार्‍यास पत्ता सांगणे चांगलेच महागात पडले आहे. दोघा भामट्यांनी व्यापार्‍याला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून ठेवत दुचाकीच्या डिक्कीत रोख रक्कम असलेली बॅग पळवून नेली.

ही घटना शहरातील कोठी रोडवर पुनममोती नगर येथे दुपारी साडे चारच्या सुमारास घडली. या घटनेने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील व्यापारी हितेन प्रवीण मेहता (रा.पूनममोती नगर, कोठी रोड) हे दुपारी ४ वाजता व्यवसायाची वेळ संपल्यानंतर दुचाकीवरून आपल्या घराकडे गेले.

ते घराजवळ गेले असता तेथे दुचाकीवर दोन इसम आले व त्यांनी मेहता यांना थांबवून मार्केट यार्ड परिसरात ब्लड बँक कोठे आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांचे लक्ष विचलित करून त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली सव्वा लाख रुपयांची रोकड व कागदपत्रे असलेली बॅग घेवून पसार झाले.

आपली बॅग पळविल्याचे लक्षात आल्यानंतर मेहता यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात जावून फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात २ चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच स्टेशन रोडवरून अशीच घटना घडली होती. त्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe