अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- राहाता तालुक्यातील वाळकी शिवारात १५ दिवसांत सुमारे २० गायींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शिर्डी नगरपंचायतीच्या कचऱ्यामुळे दूषित झालेल्या पाण्यामुळे विषबाधा झाल्याने गायींचा मृत्यू झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
याबाबत ग्रामस्थांनी सांगितले, की वाळकी येथील तलावाजवळ शिडी नगरपंचायतीच्या कचऱ्याचा डेपो आहे. येथे शिर्डीतील कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. मात्र तलावातच हा कचरा टाकला गेल्यामुळे पाणी दूषित झाले आहे. हेच पाणी जमिनीतून आसपासच्या विहिरीत उतरत आहे.
हे पाणी जनावरे व नागरिक पित आहेत. या विषारी पाण्यामुळे गावातील सुमारे २० गायी दगावल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यात सुधारणा न झाल्यास कचरा टाकणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. एका गायीची किंमत ७० ते ८० हजार रुपये आहे.
यासोबतच गाय देत असलेल्या दुधाचेही नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी दूध धंद्यावरच आपला उदरनिर्वाह करतात. एका शेतकऱ्याच्या तब्बल पाच गायी दुषित पाण्यामुळे मृत्यूमुखी पडल्या आहेत. त्यामुळे हे कुटुंब उघड्यावर आले आहे. काही दिवसांत २०हून अधिक गायींचा मृत्यू झाल्याने गावात भौतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कचऱ्यामुळे दूषित होत असलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर काही परिणाम तर होणार नाही ना, याची धास्ती ग्रामस्थांनी घेतली आहे. ज्या लोकांनी हा कचरा आणून टाकला आहे, त्यांनी पूर्ण नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा त्यांच्या घरासमोर आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्याने दिला आहे. कचरा तळ्यात टाकण्यासाठी वाळकी गावातील अनेकांनी विरोध केला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|