मित्राच्या वाढदिवसानिमित्त नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले जुन्या कारनाम्यांची आठवण….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- श्री केशवराव मुर्तडक यांचा आज वाढदिवस आहे. तब्येतीच्या कारणाने ते घरी आहेत, परंतु आज त्यांच्या जुन्या कारनाम्यांची आठवण येणे सहाजिक आहे. केशवराव सन 1985 च्या निवडणुकीत माझ्या बरोबर नव्हते, निष्ठावान काँग्रेसवाले म्हणून ते काँग्रेसचे काम करत होते.

तेव्हा मी आमदार झालो. पुढे कधी ते आमच्यात सामील झाले, एकरूप झाले आणि सर्वांचे प्रिय झाले हे समजले सुद्धा नाही. घरची तशी गरिबी. तीन भावांचा संसार, एकाच पत्र्याच्या खोलीत होता. जेवणास बसायला पुरेशी जागाही नसायची, तरीही प्रत्येकाला आग्रहाने जेवणाचे कायम निमंत्रण असायचे.

पंधरा मिनिटात वांग्याची भाजी व पोळीचे जेवण तयार करून आम्हाला जेवू घातल्याचा आमचा अनुभव आहे. त्यांचे वडीलही काँग्रेसचे कार्यकर्ते. दिल्ली नाका परिसरातील पेट्रोल पंपाच्या समोर त्यांचा हॉटेल व्यवसाय होता. त्यावर संसार चालायचा.

केशवराव यांचे व्यक्तिमत्त्व धडपडे, सतत काही ना काही धावपळ सुरू असते. ते एकदा नगरसेवकही झाले. राजकारणाचे आकलन आणि वेड त्यांच्या स्वभावातच आहे. ते बरोबर आले आणि तीर्थरूप दादांचे (भाऊसाहेबांचे) आवडते झाले. ‘ये केशव ये’ हा दादांचा आवडता शब्द होता.

केशवरावांनी माझ्या व डॉ. तांबे यांच्या गाडीत हक्काची जागा पटकावली. अनेकांना याचे आश्चर्य वाटते. ‘काय जादू केली?’ असे असे अनेक जण त्यांना म्हणत. मात्र त्याचेही कारण होते. केशवराव गाडीत कधी काम सांगत नाहीत. कटकटीचे विषय घेत नाहीत.

ते गाडीत असले की आमची मस्करी चालायची, थट्टा व्हायची. त्यात केशवरावांच्या कर्तृत्वातून काही किस्से निर्माण झालेले असायचे, काही आम्हीच मनाने तयार करायचो. मग त्या किस्स्यांवर ते चर्चा घडवायचे व खळखळून सर्वांना हसवायचे. त्यांना प्रवास करतांना गाडीत सोबत घेण्या मागचे हे खरे रहस्य.

प्रवास निखळ आनंदाने व्हायचा. केशवरावांना राजकारणात खूप काही सुचायचे ते घाईने येऊन अशी कल्पना मांडत. त्यांच्या अनेक कल्पना प्रत्यक्ष निवडणुकीत कामी यायच्या, राजकारणातल्या अनेक मोठ्या प्रश्नांची साधी आणि परिणामकारक उत्तरे केशवरावांकडे असायची.

काही कल्पना मात्र आम्ही थट्टेने, ‘काहीही सांगता’ म्हणून नाकारायचोही. मात्र त्यांची प्रत्येक कल्पना आम्हाला विचार करायला लावणारी असायची हे देखील खरे. निवडणुकीच्या काळात तर त्यांना झोपच नसायची, सारखी घाई आणि लगबग चालू.

दिवसभरात किती बैठकांना ते हजर असायचे याचा हिशेबच न केलेला बरा. केशवरावांना घुसखोरी चांगली जमते. मला आठवतं काँग्रेस पक्षाचे दिल्ली येथे राष्ट्रीय अधिवेशन होते. देशातून 30 हजार पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणास्तव कडक बंदोबस्त होता.

प्रदेश प्रतिनिधी पास असल्याने आम्हाला खूप मागे बसावे लागणार होते. केशवरावही आमच्या सोबत होते. सफेद शर्ट पॅन्ट, डोक्यावर टोपी आशा पेहरावातील केशवराव आमच्यातून निसटले आणि काही वेळात ते आम्हाला स्टेजवर सोनियाजी आणि राहुलजी यांच्याबरोबर दिसले.

तिथून आम्हाला हात करत होते, आम्ही मात्र डोक्याला हात लावला. आणि गमत म्हणजे ते आम्हाला पुढे बसण्यासाठीचे पास घेऊन पुन्हा आमच्याकडे आले. केशवरावांना अनेक कल्पना सुचत, त्यात उद्योग व्यवसायाच्या कल्पनाही असायच्या.

हॉटेल बंद झाल्यानंतर त्यांनी ट्रकचा व्यवसाय केला, त्यांनी डाळिंबाची शेती केली, फायद्यात ते कधीच आले नाही. वीस वर्षांपूर्वीची गोष्ट असेल, त्यांनी एकदा मला व डॉ. तांबे यांना आग्रहाने कल्पना मांडली. कल्पना अशी होती, ‘चहासाठी आपण चहा पावडर, दूध, साखर वापरतो.

आपण चहा पावडरचा अर्क, पिठीसाखर, दूध पावडर यांना एकत्र करून एक गोळी बनवू, ती गरम पाण्यात टाकली की चहा तयार, कशी वाटली कल्पना? असे उत्सुकतेने त्यांनी आम्हाला खूप वेळा विचारले. या केशवरावांना काय सुचेल सांगता येत नाही, असे म्हणत आम्ही त्या कल्पनेला फारसे गंभीरपणे घेतले नाही.

आज गिरनार कंपनीचा तयार चहा (रेडिमिक्स टी) बाजारात लोकप्रिय आहे. केशवराव अगदीच काही चुकीचे मांडत नव्हते असे वाटून जाते. कष्टातून, मेहनतीतून सांसारिक जीवनात केशवराव सुखी झाले. सोमनाथ कर्तबगार निघाला. मुलीचे चांगले झाले.

नातवांच्या आगमनाने घर भरून गेले. परंतु एका अपघाताने केशवरावांना घरात बसविले. त्यांची इच्छाशक्ती आम्हाला माहित आहे, ते या परिस्थितीवर मात करतील. पुन्हा आपल्यात सामील होतील, त्यासाठी या वाढदिवशी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. बाळासाहेब थोरात… (महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe