अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- कृषीप्रधान भारत देशात होत असलेल्या शेतकर्यांच्या आत्महत्या व गुरुकुल ते ऑनलाईन शिक्षण पध्दतीच्या बदलानंतर विद्यार्थ्यांना दिशा देऊन समाज घडविण्याचे कार्य करणारे शिक्षक
या दोन महत्त्वाच्या विषयांवर डॉ. प्रतिभा कृष्णा श्रीपत लिखित सुर्योदय कादंबरी व शिक्षणाच्या वाटेवरील प्रवासी या व्यक्तीरेखा चित्रण पुस्तकाचे प्रकाशन वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या हस्ते झाले.

शहरातील दातरंगे मळा येथील श्री मार्कंडेय शैक्षणिक संकुलात झालेल्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जालना येथील सेवानिवृत्त प्राध्यापिका तारा काबरा तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रत्ना बल्लाळ, ज्येष्ठ साहित्यिका प्रा. मेधा काळे, लेखिका डॉ. प्रतिभा श्रीपत, पै. नाना डोंगरे,
कैलास शंकरपेल्ली, मिरा श्रीपत, स्नेहा शंकरपेल्ली आदी व्यासपिठावर उपस्थित होते. प्रास्ताविकात लेखिका डॉ. प्रतिभा श्रीपत यांनी समाजातील काही घटना मनाला अस्वस्थ करतात. अशा घटनांनी मनाची प्रक्रिया सुरु होऊन कागदावर विचाररुपी शब्द उमटून ग्रंथ निर्माण होत असते.
अशाच पध्दतीने शेतकरी आत्महत्या व आजची शिक्षण पध्दती यावर ग्रंथ लिहिले. या ग्रंथाचे प्रकाशन जन्म भूमीत होत असल्याचे आनंद व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचा परिचय साधना कोळपेक यांनी करुन दिला.
गणेश सब्बन यांनी भक्तीगीत सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. डॉ. रत्ना बल्लाळ सुर्योदय कादंबरीची माहिती देताना म्हणाल्या की, लेखनाचा ध्यास घेऊन आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबातील जीवनाचा संघर्ष सुर्योदय कादंबरीत शब्दबध्द केला गेला आहे.
आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या पत्नीचे जीवनातील कठिण प्रसंग मनाला भिडून विचार करण्यास भाग पाडतात. तर अंधश्रध्दा व चुकिच्या समाजव्यवस्थेवर लेखिकेने आसूड ओढल्याचे त्यांनी सांगितले. कल्याणी छिंदम यांनी शिक्षणाच्या वाटेवरील प्रवासी या पुस्तकाची माहिती देताना
पहिल्यांदा लेखिकेने विद्यार्थ्यांवर पुस्तक लिहून शिक्षक कसा मित्र, मार्गदर्शक व सल्लागार ठरु शकतो हे अधोरेखित केल्याचे स्पष्ट केले. आबासाहेब मोरे म्हणाले की, सामाजिक परिवर्तनासाठी पुस्तके उपयुक्त ठरतात.
शेतकरी व शिक्षण पध्दतीत बदलाचा घाव लेखिका श्रीपत यांनी घातला आहे. समाजाचे सुक्ष्म निरीक्षण करुन त्यांनी आपले विचार ग्रंथात उतरवले. शिक्षण क्षेत्रात भगीरथ कार्य करुन समाज बदलासाठी त्यांचे साहित्य मोलाची भूमिका बजावणार असल्याचे सांगितले.
पर्यावरण संवर्धनासाठी पुस्तक लिहिण्याचे स्पष्ट करुन त्याचा खर्च निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ उचलणार असल्याचे आश्वासन दिले. तर भावी पिढीच्या कल्याणासाठी वृक्षरोपण करुन त्याचे संवर्धन करण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रा. मेधा काळे यांनी पुर्वी व सध्याच्या गुरु व शिष्याच्या नात्यात अमुलाग्र बदल झाला आहे. विद्यार्थ्यांचे दुर्गुण ओळखून त्यांना योग्य दिशा देण्याचे कार्य शिक्षक करत असतात. शिक्षक हा समाज घडविणारा महत्त्वाचा घटक आहे. लेखिकेने विद्यार्थ्यांवर पुस्तक लिहून त्यांच्या अडी-अडचणी समजून त्यांना उज्वल भविष्याची वाट दाखवली.
तर सुर्योदय या पुस्तकात आत्महत्याग्रस्त शेतकरीच्या पत्नीचा जीवन संघर्ष प्रेरणा देऊन जगण्याची उमेद देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पै. नाना डोंगरे यांनी लेखिका श्रीपत यांनी समाज बदलाच्या दृष्टीने दोन महत्त्वाचे विषय घेऊन आपल्या ग्रंथातून वाचकांना विचारमंथन करण्यास भाग पाडले आहे.
या पुस्तकांतून फक्त भावप्रवृत्त होत नाही तर, मनाचा तळ ढवळून निघत आहे. हिंदी विषयाच्या अध्यापिका असून देखील त्यांची माय मराठीची गोडी या ग्रंथातून दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्राध्यापिका तारा काबरा म्हणाल्या की, कृषी प्रधान देश असलेल्या शेतकर्यांच्या व्यथांवर त्यांनी लेखणीतून आसूड ओढले आहे.
निसर्गाचा असमतोल, अतिवृष्टी, दुष्काळ, शासन व्यवस्थेतील चुका, सावकारी यामुळे शेतकरी कसा आत्महत्येच्या खाईत लोटला गेला यावर परखड विचार मांडण्यात आले. शिक्षणाच्या वाटेवरील प्रवासी या ग्रंथात त्यांनी आजची शिक्षण पध्दती यावर विचार मांडून बदलत्या शिक्षण पध्दतीचा वेध घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये कोरोनाचे नियम पाळून हा ग्रंथ प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी शब्बीर शेख, ज्येष्ठ पत्रकार भुषण देशमुख, साहित्यिक चंद्रकांत पालवे, वनविभागाचे सेवानिवृत्त अधिकारी नंदकिशोर रामदीन, बाळकृष्ण सिद्दम, दिपक रामदीन, प्रविण गुंडू,
विनय भुस्सा, यशवंत सुरकुटला, येरगुंटला, गणेश कंडेपल्ली, बाळकृष्ण गोटीपामूल, ज्ञानेश्वर मंगलारम, विठ्ठल गुंडू, गणेश सब्बन आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका खरदास यांनी केले. आभार साईगीता सब्बन मानले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम