अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-परराज्यात होणारी कांद्याची निर्यात थंडावल्याने शेवगाव, पैठण, गेवराई, नेवासा व पाथर्डी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
सोमवारी शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये सुमारे अडीच ते तीन हजार गोण्यांची आवक झाली. मात्र, कांद्याचे दर प्रति क्विंटल १०० ते ९५०रुपये राहिले. त्यामुळे कांदा उत्पादकांच्या पदरी निराशा आली.

एकरी सरासरी ५०हजार रुपये खर्च करूनही कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना भविष्याच्या दृष्टचक्राने घेरले आहे.
शेवगाव आणि लगतच्या पैठण, गेवराई, नेवासा व पाथर्डी या तालुक्यातील मेहनती व प्रयोगशील शेतकरी अलीकडच्या काळात कांदा या नगदी पिकाकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. शेवगावच्या कांदा मार्केटला १२ अडत व्यापारी आहेत.
येथे लाल व उन्हाळी अशा दोन्ही प्रकारच्या मिक्स कांद्याची आवक होते. येथील मार्केटमध्ये कांद्याला चांगला दर मिळतो, शिवाय पट्टीची रक्कमही रोख मिळत असल्याने शेतकऱ्यांची या मार्केटला कायम वर्दळ असते.
सध्या कोरोना विषाणूने अख्खा महाराष्ट्र काबीज केला आहे. त्यामुळे कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगना या राज्यातील कांदा व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातील कांद्याकडे पाठ फिरवली आहे. सध्या हे व्यापारी गुजरात राज्यातून कांदा खरेदी करतात. त्यामुळे आपल्याकडील कांद्याला उठाव नाही. परिणामी, भाव गडगडले.
त्यातच यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांची कांदा बियाणात मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याने उत्पादित कांद्याचा दर्जाही घसरला आहे.
त्याचाही दरावर मोठा परिणाम झाला. कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय बंद असल्याने कांद्याला मागणी नाही. असा दुहेरी आर्थिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|