अरेअरे! विजेची तार अंगावर पडल्याने बैलाचा मृत्यू…. दैव बलवत्तर म्हणून कुटुंब बचावले…!

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- आयुष्यभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यासाठी त्याची बैलजोडी म्हणजे त्याचा प्राण असतो. त्या मुक्या प्राण्यांच्या साथीनेच तो आपली शेतातील सर्व कामे करतो त्यामुळे त्यांच्यावर शेतकऱ्याचा देखील खूप जीव असतो.

जर या बैलांना काही झाले तर शेतकरी पुरता हडबडून जातो. शेवगाव तालुक्यात देखील अशीच दुर्दैवी घटना घडली असून, यात त्या शेतकऱ्याचे तब्बल दीड लाखाचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील व मराठवाड्याच्या सीमेवर असणाऱ्या मौजे गायकवाड जळगाव येथील शेतकरी शेख यांनी एक महिन्यापूर्वीच दीड लाख रुपये खर्च करून शेतीकामासाठी बैलाची खरेदी केली होती.

दिवसभर शेतातील काम आटोपून काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बैलगाडी जुंपून घराकडे निघाले. यावेळी अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि रस्त्यालगत असणाऱ्या लिंबाच्या झाडाजवळुनच गेलेली विद्युत तार तुटली अन् ती थेट बैलाच्या अंगावर पडली त्यामळे क्षणार्धात बैल जमिनीवर कोसळला.

यावेळी बैलगाडीत असलेले  शेख त्यांची पत्नी व मुलीने तात्काळ गाडीतून उड्या मारल्याने मोठा अनर्थ टळला. हा सर्व प्रकार शेजारी काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्युत पुरवठा खंडित केला. मात्र तोपर्यंत या बैलाचा मृत्यू झाला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe