अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट देखील झाली. या वारे व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
याच अवकाळी वादळात शेवगाव तालुक्यातील खानापूर येथील मच्छद्रिं विश्वनाथ थोरात यांच्या उसाच्या शेतात वीज कोसळल्याने दोन एकर ऊस खाक झाला.
त्याचसोबत या आगीत उसाला केलेले ठिबक सिंचनाचे पाईप देखील पूर्णपणे जळून गेले आहेत. या दुर्घटनेत थोरात या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.
मागील दोन ते तिन दिवसांपासून हवामान खात्याने राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. त्या अंदाजानुसार शनिवारी जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, नेवासा,
संगमनेर या तालुक्यातील काही भागात दुपारनंतर प्रचंड वादळी वारे व गारपीट झाली. या वादळ व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या मात्र तोंडाजवळ आलेला घास हिरावला गेला आहे.
कारण गारपिटीने या भागातील गहू, हरभरा, चारपिके, ऊस, यासह फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याच पावसात शेवगाव तालुक्यातील खानापूर शिवारातील शेतकरी थोरात यांच्या उसाच्या शेतात वीज कोसळली.
वीज कोसळल्याने काही क्षणातच उसाने पेट घेतला. वाऱ्याचा वेग जास्त व गारांचा मारा होत असल्याने कोणाला काही प्रयत्न करण्याची संधीच मिळाली नाही. काही वेळात दोन एकर ऊस व ठिबक संच असे दोन्हीही आगीत खाक झाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|