अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- कोरोना चाचण्या व लसीकरण मोहीम हाणून पाडण्याच्या प्रयत्नांत आहेत. अशांना शासकीय योजनांचा लाभ देऊ नका, असे मत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी व्यक्त केेले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे, आरोग्य विभाग व नगरपरिषद स्वखर्चाने प्रत्येक प्रभागात जाऊन चाचणी मोहीम राबवत आहे. मोफत तपासणी असूनही नागरिक मनापासून प्रतिसाद देत नाहीत. अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत, पण असे अनुभवाला येत आहे की, काही ठरावीक लोक हेतुपुरस्सर चाचणीसाठी यायला तयार नाहीत.
इतरवेळी शासकिय योजनांचा लाभ घेण्यासाठी रांगा लावणारे, लाभ घेणारे चाचणी व लसीकरण करण्यास टाळाटाळ करत आहेत. शासनाने कठोर भूमिका घेऊन देशातल्या प्रत्येक नागरिकाला यासाठी सक्तीच केली पाहिजे.
चाचणी व लसीकरण करणाऱ्यांनाच फक्त सर्व शासकीय योजनांचे लाभ दिले पाहिजेत. जे लोक शासकिय आदेश पाळणार नाहीत, त्यांचे रेशन, पिवळे रेशनकार्ड, गॅस सबसिडी, पंतप्रधान आवास योजना, सर्व शासकिय अनुदाने, वेतन, आर्थिक लाभ बंद केले पाहिजेत.
मास्क वापरायचे नाहीत, कोरोना विरूद्धच्या मोहिमेला प्रतिसाद द्यायचा नाही अशा प्रवृत्तीच्या लोकांचे लाड बंद करावेत. देशातील एक मोठा वर्ग असे नियमबाह्य व धोकादायक वर्तन करत असेल, तर कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी होईल?
राजकारण्यांनीसुद्धा आपापल्या कार्यकर्त्यांना टेस्टिंग-लसीकरण सक्तीचे केले पाहिजे. मतांचा विचार न करता कायदे राबवा.
अन्यथा अजून लाखो बळी गेल्याशिवाय राहणार नाहीत. शासकिय लाभ घ्यायचे-हक्क गाजवायचे, पण कर्तव्य करायचे नाही हे चालू देऊ नये, असे नगराध्यक्ष वहाडणे यांनी निवेदनात म्हटले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम