अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- कोरोनाच्या तिसर्या लाटेची पुर्वतयारी म्हणून गोर-गरीब रुग्णांच्या सोयीसाठी भिंगार येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन सेवा सुरू करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी व ऊस तोड कामगार वाहतूक, मुकादम संघटनेच्या वतीने करण्यात आली.
या मागणीसाठी शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल पाडळे, जिल्हा उपाध्यक्ष सागर चाबुकस्वार, ज्येष्ठ नेते सुनील शिंदे, दिलीप साळवे, सुनील गट्टाणी, विवेक विधाते, जीवन कांबळे,
नवीन भिंगारदिवे, प्रवीण जाधव, संतोष धीवर, बाळासाहेब भिंगारदिवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनाच्या दुसर्या लाटेत अनेक रुग्णांची ऑक्सिजन बेड अभावी हेळसांड झाली. काहींना ऑक्सिजन बेड न मिळाल्याने परिस्थिती गंभीर बनली.
सर्वसामान्य गोर-गरीब रुग्ण ऑक्सिजन बेडसाठी जिल्हा रुग्णालय येथे प्रतिक्षेत होते. त्यांची खाजगी रुग्णालयात दाखल होण्याची आर्थिक परिस्थिती नव्हती. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांचे प्राण जाऊन त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले.
उपचारासाठी काहींनी व्याजाने पैसे घेतले तर काहींनी आपले दागिने गहाण ठेवून रुग्णांना बरे केले. अहमदनगर जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण जास्त होते. दुसर्या लाटेत भिंगार शहरातील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलने कौतुकास्पद कार्य केले.
उपलब्ध सोयी-सुविधामध्ये कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलने कोरोना बाधितांवर उपचार केले. गंभीर परिस्थिती असलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालय, बुथ हॉस्पिटल व खाजगी दवाखान्यात पाठविण्यात आले. या संकटकाळात अनेक खाजगी हॉस्पिटलने लाखो रुपयांचे बिल आकारुन रुग्णांची आर्थिक पिळवणुक केलेली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
भविष्यात तिसरी लाट निर्माण झाल्यास मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासणार आहे. सध्या सर्वांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना परवडेल अशा पध्दतीने उपचार घेण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम