अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- आतापर्यंत आपण महत्त्वाच्या व्यक्ती किंवा पुढाऱ्यांना, गोपनीय वस्तू यांना पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येत असल्याचे पाहिले आहे. परंतु आता चक्क टँकरला असाच बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
त्याचे कारण तो टँकर ऑक्सिजनचा आहे.त्याचे झाले असे की, मंगळवारी नगर जिल्ह्यासाठी येणारा ऑक्सिजनचा टॅंकर पुणे जिल्ह्यात अडवण्यात आला होता. मात्र महत्प्रयासाने संपर्क साधून हा ऑक्सिजनचा टँकर जिल्ह्यात आणला गेला.
या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाने आता खबरदारीचे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यासाठी ऑक्सिजन घेऊन येणारे टँकर प्लांटच्या ठिकाणी भरले की त्याच्याबरोबर आता नगर जिल्ह्यातील महसूल, पोलीस व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची कुमक राहणार आहे.
त्यामुळे ऑक्सीजन भरून निघालेला टँकर सुरक्षितरित्या व निर्धोक पद्धतीने जिल्ह्यात येण्यास मदत होईल. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या उच्चांकी प्रमाणात वाढत आहे.
त्यामुळे उपचारासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन आणि रेमेडिसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.
असलेली गरज आणि प्राप्त होणारा दैनंदिन पुरवठा यांचे व्यस्त प्रमाण असल्याने मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासनातील यंत्रणेची तारेवरची कसरत सुरू आहे.
जिल्ह्यात मार्चअखेर कोरोना बाधितांची मोठी संख्या वाढू लागली. या परिस्थितीत कोरोना बाधितावर उपचारासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली.
सध्या जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात असलेल्या ऑक्सिजन बेडवरील रुग्णांच्या उपचारासाठी दैनंदिन गरज ६० टन ऑक्सिजनचे आहे. मात्र, गरजेच्या तुलनेत अपुरा पुरवठा होत असल्याने त्याचा मेळ घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मंगळवारी शहरात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा होता. पूर्वतयारी व नियोजनाने प्रशासनाने चाकण येथील कंपन्यांची निरंतर पाठपुरावा केला. त्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांचे निरंतर फोन सुरू होते.
प्रशासनाच्या मोठ्या मिनतवारीने जिल्ह्यासाठी १९ टनाचा एक व दहा टनाचा एक टँकर भरून मिळाला. मात्र, पुणे जिल्ह्याच्या हद्दीत नगर जिल्ह्यासाठी ऑक्सिजन घेऊन रवाना झालेला टँकर अडविण्यात आला.
याची माहिती मिळताच थेट पुणे जिल्हाधिकारी, नाशिक विभागीय आयुक्त आणि मंत्रालयीन पातळीवर संपर्क करीत टँकरचा रस्ता मोकळा करण्यात आला. दरम्यान या फोना-फोनीमध्ये जवळपास सहा तासाचा अवधी उलटला.
खबरदारीचा उपाय म्हणून नगर जिल्ह्यातील पोलिस व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची कुमक शिरूर हद्दीवर पाठविण्यात आली. मात्र, अडथळ्याची शर्यत सुरुच होती. रात्री दिडच्या सुमारास हा टँकर नगरमध्ये दाखल झाला.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|