पाऊस काळ्या ढगाआड गायब झाल्याने अकोल्यात भात पिके सापडली अडचणीत

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- जून महिन्याच्या सुरवातीलाच अकोले तालुक्यात पर्जन्यवृष्टी झाली. पण गेल्या आठ दिवसांपासून पाऊस एकदमच गायब झाला असून जुलै महिना सुरु झाला तरी एकप्रकारे उन्हाळी वातावरण निर्माण झाले आहे.

पाऊस अचानक गायब झाल्याने त्याचा परिणाम तालुक्यातील भात व माळरानावरील पावसाळी पिकांवर झाला असून कधी पाऊस सुरु होतो याकडेच आता शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

अकोले तालुक्यातील आदिवासी पट्ट्यामध्ये बहुतेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर या पिकाची लागवड केली जाते. त्यासाठी जागोजागी राबनी करून रोपे टाकण्यात आलेली आहेत.

त्याचबरोबर इतरही पिकांची तयारी केली जाते यामध्ये प्रामुख्याने भात, नागली, वरई, तूर, मूग, उडीद, खुरसणी, जवस या पिकांचा समावेश होतो. या भागासाठी हा हंगाम अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कुटुंबासाठी लागणारे बहुतेक अन्नधान्य याच हंगामात निर्माण होते.

तसेच या हंगामावर येणार्‍या पिकांच्या आधारेच तिथली अर्थव्यवस्था फिरत असते. निसर्गाच्या कृपेने वेळेत पाऊस सुरू होऊन सर्व पिकांना जीवदान मिळावे यासाठी शेतकरी आकाशाकडे नजर लावून बसला आहे. दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.

हवामान बदलाचा मोठा फटका चालू हंगामात बसताना दिसत आहे. जागतिक तपमान वाढीमुळे ही संकटे या पुढे येत राहतील असे भाकीत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. क्लायमेट स्मार्ट शेती धोरण जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे.

आपल्या मातीत हेच प्रयोग राबवले गेले पाहिजेत तरच शेतकरी आणि शेती वाचू शकते. एकूणच पावसाने अचानक दडी मारल्याने अकोले तालुक्यातील भात तसेच इतर पावसाळी पिकांची परिस्थिती अत्यंत बिकट बनली असून कधी पाऊस पडतो, याची प्रतीक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe