Panjab Dakh News : जेष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख हे नेहमीच आपल्या हवामान अंदाजासाठी चर्चेत राहतात. शेतकऱ्यांचा त्यांच्या हवामान अंदाजावर पूर्ण विश्वास आहे. शेतकरी सांगतात की, डख यांच्या हवामान अंदाजामुळे त्यांना शेती कामे करताना मोठा फायदा होतो. मात्र, डख यांचा यंदाचा अंदाज हा फोल ठरला आहे.
डख यांनी यंदा आठ जूनला मान्सून आगमन होईल असं सांगितलं होत, पण मान्सून यंदा उशिराने दाखल झाला आहे. शिवाय त्यांनी 22 जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार असं भाकीत व्यक्त केलं होतं परंतु अद्याप मान्सून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्येच खिळून बसला आहे.
विशेष म्हणजे 18 जून पर्यंत मान्सूनला पुढील प्रवासासाठी पोषक हवामान नसल्याचे भारतीय हवामान विभागाने नमूद केले आहे. तसेच आय एम डी ने 18 जून ते 21 जून दरम्यान मान्सूनचे मुंबईमध्ये आगमन होईल असे स्पष्ट केले आहे. एकंदरीत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी अजून बराच काळ वाट पहावी लागणार आहे.
यामुळे यावर्षी डख यांचा अंदाज फोल ठरला असल्याच्या चर्चा आता अनेक शेतकऱ्यांमध्ये दबक्या आवाजात पाहायला मिळत आहेत. मात्र काही शेतकऱ्यांना अजूनही डख यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. दरम्यान, पंजाब डख यांनी नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्याच्या मौजे पांगरी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात पंजाब डख यांनी पुढील हवामान अंदाज वर्तवला आहे.
त्यांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार 16 जून पर्यंत नाशिक जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. विशेष म्हणजे 27 जून ते एक जुलै पर्यंत महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडणार असल्याच भाकीत त्यांनी यावेळी व्यक्त केल आहे. या कालावधीत एवढा पाऊस पडेल की शेतकऱ्यांना शेतातील पाणी काढून देण्यासाठी शेतात चर खोदावे लागतील असे देखील त्यांनी नमूद केले आहे.
मात्र शेतकऱ्यांनी पेरणी करताना पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. साधारणता 22 इंच जमिनीत ओल गेल्यानंतर पेरणी करा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे. एवढेच नाही तर त्यांनी जून, जुलै आणि ऑगस्ट मध्ये भरपूर पाऊस पडणार असेही यावेळी सांगितले आहे. निश्चितच पंजाब डख यांचा हा हवामान अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.