अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- आजची तरुणाई वेगवेगळ्या नशेच्या आहारी चालली आहे. नशेचे वेगवेगळे पदार्थ शोधले जात आहेत.
ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कल्याणमधून तरुणाईला नशेच्या गर्तेत लोटणा-या एलएसडी पेपर अर्थात ‘पेपरबॉम्ब’ या ड्रग्जचा तब्बल एक कोटीचा साठा जप्त केला.
ड्रग पेडलर्स पुन्हा सक्रिय :- या पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल एक हजार ४६६ एलएसडी पेपर जप्त करण्यात आले.
याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना कल्याण न्यायालयाने 22 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. टाळेबंदी शिथील झाल्यानंतर ड्रग पेडलर्स पुन्हा सक्रिय झाले आहेत.
तिघांची जेलवारी :- कल्याण येथे ड्रग्ज विक्री करण्यासाठी एक तरुण येणार असल्याची माहिती ठाणे अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीनुसार बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आधारवाडी चौक ते बिर्ला कॉलेज रिंग रोड या ठिकाणी सापळा लावण्यात आला.
पोलिसांनी भाविक ठक्कर (22) या संशयित तरुणास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एलएसडी पेपरबॉम्ब मिळाले.
आरोपीची अधिक चौकशी केली असता आणखी दोन बडय़ा ड्रग्ज पेडलर्सची नावे समोर आली. त्यानुसार मनी भार्गव आणि निवांत विल्हेकर या ड्रग्ज पेडलर्सना ताब्यात घेण्यात आले.
पाच हजार रुपयांना एक कागदी तुकडा :- एलएसडी म्हणजेच पेपरबॉम्ब हा अमली पदार्थ म्हणजे एक छोटासा कागदी तुकडा असतो. त्यावर पक्षी-प्राण्यांची चित्रे असतात. या कागदावर ‘लेसरजीक ऑसिड डाय एथिल अमाइड’ हे अमली द्रव शिंपडले जाते.
त्यानंतर या पेपरवरील दोन ते तीन इंच कागदी तुकडा तब्बल पाच हजार रुपयांना विकला जातो. या कागदाच्या खरेदीसाठी नशेबाज सुपरमॅन, बॅटमॅनसारखे परवलीचे शब्द वापरतात. या कागदाला जिभेवर ठेवल्यानंतर तब्बल 10 ते 12 तास नशेची झिंग येते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम