अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :-आमदार डॉ. किरण लहामटे यांचे सुरु असणारे चांगले काम पहावत नाही. आमदार स्टंटबाजी करत असतील तर कालची ‘त्यांची’ नौटंकी होती का? अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
तालुक्यातील सुगाव येथे प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, सेवा निवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, ज्युनिअर व सिनीयर प्राध्यापक,

दानशूर व्यक्ती यांचे योगदानातून उभ्या राहिलेल्या ऑक्सिजन बेड युक्त कोविड सेंटरच्या उद्घाटनानंतर माजी आमदार वैभव पिचड यांनी कोरोनाच्या या संकट काळात रुग्ण व नागरिकांना मदत करण्याऐवजी तालुक्याचे लोकप्रतिनिधी स्टंटबाजी करत आहे.
असा आरोप आमदार डॉ. लहामटे यांचे नाव न घेता केला होता.त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काल येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी तिकांडे बोलत होते. तिकांडे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गर्दी होऊ नये म्हणून वेळेत उद्घाटन पार पडावे,
असा आमदार लहामटे यांचा उद्देश होता. मात्र, काही लोकांनी पद्मश्री राहीबाई पोपरे व निवृत्ती महाराज देशमुख यांचे अडून राजकारण केले. दोन्हीही व्यक्ती महनीय असून ऐनवेळी त्यांना बोलावून जाणिवपूर्वक आमदारांच्या हस्ते उद्घाटन होऊ न देण्याचा डाव होता असा आरोप त्यांनी केला.
ज्येष्ठ नेते संपतराव नाईकवाडी म्हणाले, तालुक्याची वेगळी ओळख व संस्कृती आहे. माजी आ. पिचड यांनी आ. लहामटे हे तसे बोलले नसतांना त्यांच्यावर नाहक आरोप केले. राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष स्वाती शेणकर म्हणाल्या,सुगाव येथील प्रकार निंदनीय आहे.
खरी स्टंटबाजी कोण करत आहे, हे लोकांना चांगले माहिती आहेत. यापुढे आमदारांची बदनामी सहन करणार नाही.यावेळी ज्येष्ठ नेते अरुण रुपवते, सुरेश खांडगे, सुरेश गडाख, चंद्रभान नवले, विकास बंगाळ, अमित नाईकवाडी, संदीप शेणकर, हरीश माने, ईश्वर वाकचौरे आदी हजर होते.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|