अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- शहरातील अनेक रस्ते खड्डेमय बनले असताना आम आदमी पार्टीच्या वतीने खड्ड्यात उतरुन आंदोलन करण्यात आले. लोकप्रतिनिधींनी शहर खड्ड्यात टाकल्याच्या घोषणा देत शहरातील शनि चौकातील खड्डेमय रस्त्यावर महापालिकेचा निषेध नोंदविण्यात आला.
या आंदोलनात आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष राजेंद्र कर्डिले, महिला स अंघटक सुचिता शेळके, संपत मोरे, रवी सातपुते, दिलीप घुले, रेव्ह. आश्विन शेळके आदी सहभागी झाले होते. शहरात पाईपलाइन व ड्रेनेजलाईनसाठी मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्यात आले होते.
मात्र ते खड्डे व्यवस्थित बुझविण्यात आलेले नाही. पावसामुळे अनेक निकृष्ट रस्ते मोठ्या प्रमाणात उघडून, शहरातील अनेक रस्ते खड्डेमय बनले आहे. लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे डोळेझाक करीत आहे.
लोकप्रतिनिधींनी टक्केवारीपायी शहर खड्ड्यात टाकले असल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडलेले असल्याने नागरिकांना मोठी कसरत करुन वाहने चालवावी लागत आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांचे खड्डेमय रस्त्यांमुळे लहान-मोठे अपघात होत आहे.
तर नागरिकांना पाठ दुखीचा त्रास सुरु झाला आहे. पावसाळा सुरु होण्यापुर्वी महापालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष न दिल्याने खड्डेमय रस्ते धोकादायक व जीवघेणे बनले असून, महापालिकेने त्वरीत खड्डेमय रस्त्यांची पॅचिंग करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.
नागरी समस्या सोडविणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. मात्र लोकप्रतिनिधी राजकारण व वशिलेबाजीच्या लसीकरणात गुंतल्याने त्यांचा खड्डेमय रस्त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. महापालिकेत सत्ताधारी व विरोधकांना नागरिकांच्या प्रश्नांची जाणीव राहिलेली नाही.
सोयीचे राजकारण सुरु असून, आम आदमी पार्टी नागरिकांच्या प्रश्नांवर लढत आहे. नागरिकांनी देखील रस्त्यावर उतरल्याशिवाय शहरातील खड्ड्यांचा प्रश्न सुटणार नाही. -राजेंद्र कर्डिले (शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी)
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम