मुख्य कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- शेतकरी, व्यापारी व हमाल-माथाडींचे नुकसान होत असल्याने शहरातील कोठी येथील मुख्य कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन अहमदनगर भाजीपाला, फळफळावळ आडत्यांचे असोसिएशनच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे.

मुख्य बाजार समिती सुरु करण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती राजकीय दडपणाखाली निर्णय घेत असल्याचा आरोप करुन, येत्या दोन दिवसात बाजार समिती सुरु न झाल्यास नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा असोसिएशनच्या वतीने देण्यात आला असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे यांनी दिली.

महापालिका हद्दीमध्ये असलेल्या कोठी येथील मुख्य कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित भाजीपाला व फळे विक्री करण्यास महापालिका आयुक्तांनी दि.14 मे रोजीच्या आदेशान्वये बंदी घातली आहे. मात्र त्यानंतर जिल्हाधिकारी व आयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार करून अटी व शर्ती निश्‍चित करून भाजीपाला व फळे विक्री व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी म्हणून विनंती करण्यात आली होती.

भाजीपाला व फळे विक्रीस परवानगी न देता, जिल्हाधिकारी यांनी दि.24 मे रोजी अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यात व नगर तालुका उपबाजार समिती सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र बाजार समितीस परवानगी देण्याबाबत जिल्हा उपनिबंधक, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव व व्यापार्‍यांचे संयुक्तिक नियोजन अहवाल सादर करण्याबाबत तोंडी सूचित केले होते.

त्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक यांनी अहवाल सादर केले. मात्र असे असताना अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती व त्यांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांचेद्वारे दि.1 जून रोजी राजकीय दबावाला बळी पडून मुख्य कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला, फळे व फुले विक्री विभागास परवानगी नाकारण्यात आली आहे. सदर ठिकाणी केवळ भुसार मालाच्या विक्रीस व भाजीपाला, फळे द्वारविक्रीस परवानगी दिली.

परंतु 1 जून रोजी नगर शहराच्या बाजारपेठेतील भुसार माल व किराणा ठोक व्यापारास परवानगी दिली आहे. मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे भाजीपाला व फळे विक्रीस काही निर्बंध घालून परवानगी देणे आवश्यक असताना

जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती यांच्याकडून राजकीय दबावाला बळी पडून परवानगी देण्यास मुद्दाम टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. फळे, भाजीपाला व फुल व्यापारी आडत मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेले आहे.

त्यांच्या दुकानात काम करणारे हमाल, माथाडी कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नगर तालुका येथील कृषी उत्पन्न उपबाजार समिती नेप्ती या ठिकाणी कांदा मार्केटसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. मात्र फळे, भाजीपाला वगैरे विक्रीसाठी तेथे कोणतीही व्यवस्था जागा उपलब्ध नाही.

त्यामुळे ग्रामीण भागातून फळे, भाजीपाला घेऊन येणार्‍या शेतकर्‍यांना त्याचा मालक विक्रीसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांच्या शेती मालाचे नुकसान होत आहे. मनपा हद्दीतील किरकोळ भाजीपाला व फळे विक्री सुद्धा माल खरेदी करण्यात गैरसोय होत असल्याने,

शहरातील कोठी येथील मुख्य कृषी उत्पन्न बाजार समिती येथील फळ, फुले व भाजीपाला विक्री विभाग सुरू करण्यास परवानगी मिळण्यासाठी संबंधित विभागास आदेश देण्याची मागणी अहमदनगर भाजीपाला, फळफळावळ आडत्यांचे असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe