काळ्या बाजारात चालवलेला रेशनचा ६०० गोण्या तांदूळ जप्त ‘या’ पोलिसांची धडक कारवाई

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-रेशनचा काळ्याबाजारात जाणारा सुमारे सहाशे गोण्या तांदुळ व एक ट्रक असा तब्बल ३२ लाख, पाच हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ही धडक कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या पथकाने गुरुवारी दुपारी पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी शिवार येथे केली. या प्रकरणी पोलिसांनी बाजीराव तुळशीराम पालवे रा.बडेवाडी व बबनराव भगवान घोरपडे (रा. शिरुरकासार जि.बीड) यांच्या विरुद्ध जीवनावश्यक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून,

चालक बाजीराव पालवे यास अटक केली आहे. याबाबत सविस्तर असे की, रेशेनचे मोठ्या प्रमाणात धान्य एका ट्रकमधून काळाबाजारात विक्रीसाठी घेवून जात असल्याची माहिती गुप्त बातमीदाराने उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांना दिली. मुंडे यांनी मिळालेल्या माहितीवरुन बडेवाडी शिवारास पोलिसांनी सापळा लावला.

मुंडे यांच्या पथकातील पोलिसांनी संशयित ट्रक चालकाला माहिती विचारल्यानंतर त्याने सांगितले की, शिरुर कासार येथील बबनराव भगवान घोरपडे यांचा सहाशे गोण्या तांदुळ गुजरातकडे घेवुन जात आहे. त्यावरुन ही चौदा टायरची मालट्रक ताब्यात घेतली, तेव्हा हा रेशनचा तांदुळ असून तो काळ्याबाजारात विक्रीसाठी घेवुन जात असल्याचे उघड झाले आहे.

सहाशे गोण्या तांदुळ हा तिनशे सहा क्विंटल असल्याचे सांगण्यात आले. पंचवीस लाख रुपयाची ट्रक व सात लाख रुपयाचा तांदुळ असा माल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर इलग यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. बाजीराव पालवे यास अटक करण्यात आली आहे. बबनराव घोरपडे यांचा पोलिस शोध घेत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News