अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- शेवगाव-पाथर्डी नगरपरिषदेसह दोन्ही तालुक्यांतील 54 गावांना जायकवाडी धरणाच्या किनार्यावरील दहिफळ येथील जॅकवेलवरून पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी दररोज 1 कोटी 36 लिटर पाणी उपसा करावा लागतो.
दहिफळ येथील जॅकवेलसह खंडोबामाळ व अमरापूर येथील पंप हाऊसला पाणी उपसा व वितरणासाठी महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो.
मात्र या योजनेवरील वीज बिलाची मागील थकबाकी 2 कोटी 21 लाख 47 हजार असून चालू थकबाकी 27 लाख 60 हजार रुपये आहे.
योजनेवरील एकूण थकबाकी 2 कोटी ४९ लाख ७ हजार रुपये असल्याने महावितरणच्या वसुली मोहिमेअंतर्गत थकबाकी भरण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार मंगळवारी येथील वीजपुरवठा खंडित केला.
थकीत वीज बिलाच्या कारणामुळे शहराटकळी व हातगाव या दोन्ही पाणी योजनांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे शेवगाव शहरासह संपूर्ण तालुक्याचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
संबंधित योजना चालवणार्या जिल्हा परिषद व ठेकेदाराने दोन्ही नगरपरिषदा व ग्रामपंचायतीकडील पाणीपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला.
मात्र दोन्ही नगरपरिषदा व संबंधित ग्रामपंचायतीकडून पुर्तता झाली नसल्याने ऐन उन्हाळ्याच्या पार्श्वभुमिवर विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे जवळपास तीन लाख लोकसंख्येवर पाणी टंचाईचे सावट पसरले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|