Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र आता ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मध्यावधी निवडणूक लागण्याची विधाने केली जात आहेत.
महाविकास आघाडी सरकार असताना भाजपकडून वारंवार मध्यावधी निवडणूका लागणार असल्याचे बोलले जात होते. मात्र अजूनही राज्यात मध्यावधी निवडणुका लागलेल्या नाहीत.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत जेलमधून बाहेर येताच आता पुन्हा एकदा ते शिंदे गटावर टीका करण्यास सक्रिय झाले आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणूक लागणार असल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच संजय राऊत यांनी मध्यावधी निवडणुकीबाबत एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे राजकारण खूपच अस्थिर झाले आहे. ते इतके की मध्यावधीची तयारी दिल्लीत सुरू झाली आहे. महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होणार आहेत, असे विधान राऊत यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील मोठमोठे प्रकल्प राज्याबाहेर चालले आहेत. मात्र शिंदे आणि भाजप सरकार याबाबत काहीच पाऊले उचलत नाही. याबाबतही संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रातून एकापाठोपाठ एक प्रकल्प जात आहेत. त्यावर कुणीच बोलत नाही. एकमेकांवर खापर फोडण्यापेक्षा हे प्रकल्प का जात आहे? हे प्रकल्प कोण ओरबाडत आहे? यावर महाराष्ट्र म्हणून सत्ताधारी आणि विरोधकांनी विचार करावा आणि निर्णय घ्यावा असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राचे नुकसान होत असल्याची खंतही संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, आपण सर्वांनीच विचार करावा. महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. ते कसे रोखता येईल. महाराष्ट्राला भगदाड पाडण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्राला औद्योगिक दृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
महाराष्ट्राला देशाच्या नकाशावरून नष्ट करण्याचे पडद्यामागे प्रयत्न सुरू आहेत. ते रोखण्यासाठी काही काळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं थांबवावं. उणीदुणी काढू नये. फडणवीस यांनी पुढाकार घेऊन विरोधकांची बैठक बोलवावी असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.