ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांची वेळेत निर्मिती आणि साठवणूक करण्यास प्राधान्य :पालकमंत्री हसन मुश्रीफ

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा सामना करण्याच्या अनुषंगाने आरोग्यविषयक सुविधांच्या बळकटीकरणासोबतच पुरेशा ऑक्सीजन निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पांची वेळेत उभारणी करणे आणि पुरेशी साठवणूक क्षमता यास प्राधान्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी आज कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेतला.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी उदय किसवे, उर्मिला पाटील, रोहिणी न-हे, जयश्री आव्हाड, उज्ज्वला गाडेकर, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, अन्न व औषध प्रशासन उपायुक्त अशोक राठोड,

साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके आदींची यावेळी उपस्थिती होती. त्यानंतर पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी, जिल्ह्यातील सध्याची कोरोना परिस्थिती, लसीकरणाची सद्यस्थिती, कोणत्या भागात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण जास्त आहे, म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या, त्यासाठीचा उपलब्ध औषधसाठा, संभाव्य तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेली तयारी आदींचा आढावा घेतला.

जिल्ह्यात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या घटत असल्याचे चित्र आहे. दुसरी लाट ओसरत चालली असली तरी ग्रामीण भागात काही ठिकाणी रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. अधिकाधिक आरटीपीसीआर चाचण्या घेणे आणि बाधितांना शोधून संपर्क साखळी तोडणे महत्वाचे आहे. मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा पॉझिटीव्हीटी रेट कमी कमी होत आहे. जून महिन्याच्या अखेरीस हा दर केवळ ३.३७ टक्के इतका खाली आला आहे.

नागरिकांनी काळजी घेतली तर आपण कोरोनाला रोखू शकतो, असे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यात संभाव्य तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला तयारी करण्यास सांगितले होते. त्यानुसार, जिल्ह्यात नव्याने १४ ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत. दुसर्‍या लाटेत जिल्ह्याची ऑक्सीजनची सर्वाधीक मागणी ७६ मेट्रीक टन इतकी होती.

त्याच्या तीन पट (२२८ मे. टन) मागणीची आवश्यकता गृहित धरुन ऑक्सीजन निर्मिती आणि साठवणूक क्षमता निर्माण करण्याच्या सूचना दिल्या असून त्याप्रमाणे जिल्हा प्रशासन कार्यवाही करत असल्याचे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारकडून राज्याला लस मिळण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

त्यामुळे पाहिजे तितक्या वेगाने लसीकरण मोहिम राबविता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे प्राप्त लशीचे योग्य नियोजन करुन शक्य तितक्या वेगाने लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत, याची पुरेशी काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.

सध्या जिल्ह्यात ९ लाख ९५ हजार ५८९ व्यक्तींनी लसीची मात्रा घेतल्याची माहिती त्यांनी दिली. आतापर्यंत जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे ८ लाख १९ हजार २७० आणि कोवॅक्सिनचे १ लाख ९० हजार २६० असे एकूण १० लाख ९ हजार ५३० डोस प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.

पीक पेरणीचाही घेतला आढावा पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी कृषी यंत्रणेकडून जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी , पेरणी झालेले क्षेत्र, पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यातील पेरणी क्षेत्रावर होणारा परिणाम याचा सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दुबार पेरणीची वेळ येणार नाही आणि पुरेसा पाऊस पडेल, अशी आशा करु या, असे त्यांनी सांगितले.

पाऊस आठवडाभर लांबला तर मूग आणि उडीदाची दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. मात्र, पाऊस वेळेवर येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी त्यांना माहिती दिली. कृषी विद्यापीठात वृक्षारोपण पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी आज राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वनमहोत्सव -२०२१ चे उद्धाटन केले.

यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती. जिल्हा रुग्णालयातील लॉन्ड्रीचा शुभारंभ येथील जिल्हा रुग्णालयातील लॉन्ड्रीचा शुभारंभ आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला.

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून याठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे. ती आजपासून कार्यान्वित करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!